ठाणे : प्रेमप्रकरणाच्या वादातून पडघ्यात जिलेटीनचा स्फोट घडविणाऱ्या प्रमोद प्रभाकर दळवी (२५, ), सिद्धेश प्रभाकर दळवी (२० रा. दोघेही खालिंग, ता. भिवंडी) आणि रोशन शेलार (१९, रा. दळेपाडा, ता. भिवंडी) या तिघांनाही ९ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यांनी स्फोटासाठी सामग्री कशी जमा केली, त्यातून स्फोटक कसे बनविले आदींचा तपास करण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलिसांनी त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली होती.अभिजित घरत याला २८ जुलैला रात्री ८.३० वा.च्या सुमारास पाठविण्यात आलेल्या गिफ्टच्या पॅकेटमध्ये स्फोटके होती. त्याच्या आईने बॉक्स उघडताच स्फोट झाल्यामुळे त्या जखमी झाल्या होत्या. या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात ३० जुलैला खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे यांच्या पथकाने केलेल्या तपासात सिद्धेश, प्रमोद आणि रोशन या तिघांनी अभिजितला मारण्याचा कट रचल्याचे उघड झाले. आता या तिघांना आणखी कोणी मदत केली? त्यांनी आणखी कुठे असे प्रकार केले आहेत का? या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याचे पुकळे यांनी सांगितले. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
पडघा स्फोटातील आरोपींना कोठडी
By admin | Published: August 03, 2016 3:15 AM