लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : भायखळ्यातील महिला कारागृहातील कैदी मंजुळा गोविंद शेट्ये (वय ३२) हिच्या मृत्यूप्रकरणी अटक केलेल्या तुरुंगाधिकारी मनीषा पोखरकरसह सहा जणांना सात जुलैपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. कारागृह रक्षक बिंदू निकाडे, शीतल शेगावकर, सुरेखा गुळवे, वसीमा शेख व आरती शिंगारे अशी अन्य आरोपींची नावे आहेत. पैकी बिंदू निकाडे वगळता इतरांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.भायखळ्यातील महिला कारागृहात २३ जूनला रात्री घडलेल्या या घटनेमुळे राज्यातील कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली. त्यामुळे या सातही संशयित आरोपींच्या तपासातून कोणती माहिती पुढे येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भावजयीच्या खुनाच्या आरोपात शिक्षा भोगत असलेल्या मंजुळा शेट्येला अंडे चोरल्याच्या कारणावरून बेदम व अमानुष मारहाण करण्यात आली. त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. मात्र तिला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न तुरुंग प्रशासनाकडून झाला होता. पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याचा तपास गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविला आहे. याप्रकरणी शनिवारी पहिल्यांदा निलंबित महिला रक्षक बिंदू निकाडेला अटक झाली होती. त्यानंतर रात्री तुरुंगाधिकारी मनीषा पोखरकर हिच्यासह अन्य चौघींनाही अटक करण्यात आली. आज सकाळी त्यांना न्यायालयात हजर केले असता सात जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.
जेलरसह सहा जणांना पोलीस कोठडी
By admin | Published: July 03, 2017 5:05 AM