मुंबई : पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या प्रत्येक महत्वपूर्ण घडामोडीची नोंद असलेली हाताने लिहावयाची नोंद वही (स्टेशन डायरी) आता महाराष्ट्र पोलीस दलातून हद्दपार झाली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यातील दैनदिन नोंदीसाठी गुन्हा व गुन्हे शोध कार्यप्रणालीचा (सीसीटीएनएस) वापर करण्यात येत आहे. त्यामुळे हाताने लिहावयाची स्टेशन डायरीची पद्धत पूर्णपणे बंद करावी, असे आदेश पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी सर्व घटकप्रमुखांना दिले आहेत.
गेल्या काही वर्षापासून पोलिसांच्या सक्षमीकरणांतर्गंत अद्ययावत तंत्रज्ञान अवगत करण्यात येत आहे. मात्र, अद्यापही काही ठिकाणी पहिल्यादा हाताने लिहून नंतर त्यांची ‘सीसीटीएनएस’वर नोंद घेतली जात होती, त्यामुळे विनाकारण वेळ वाया जात असल्याने महासंचालकांनी पहिली पद्धत रद्द करण्याची स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
पोलिसांच्या आधुनिकीकरणांतर्गंत क्राईम अॅण्ड क्रिमिनल ट्रॅँकिग नेटवर्क सिस्टीम (सीसीटीएनएस) वर्षभरापूर्वी मुंबई, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातर्गंत घेतली जात होती. मात्र, आता ती राज्यातील प्रत्येक प्रत्येक पोलीस घटकांमध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यात येणारी तक्रार, गुन्ह्याची नोंद संगणकाद्वारे घेतली जात आहे. त्यासाठी पोलिस कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. नवी पद्धत अत्यंत सुटसुटीत असल्याने पूर्वीप्रमाणे हाताने डायरी लिहिण्याची गरज भासत नाही. मात्र, पूर्वापारच्या सवयीप्रमाणे काही ठिकाणी पहिल्यादा ‘एफआयआर’ हा स्टेशन डायरीवर घेतला जातो. त्यानंतर तीच माहिती संगणकावर भरुन घेतली जात होती. या पद्धतीमुळे पोलिसांचा विनाकारण वेळ वाया जात असे. तो कालावधी गुन्ह्याच्या तपासासाठी वापरल्यास गुन्ह्याची निर्गतीकरणाचे काम जलद व सुलभ होण्यास मदत होऊ शकते, त्यामुळे यापुढे हाताने डायरीची नोंद घेवू नये, रोज दिवसभरात ‘सीसीटीएनएस’वर घेतलेल्या प्रत्येक नोंदीची रोज रात्री बारा वाजता त्याची प्रिंट काढून अभिलेखावर ठेवण्यात यावी, अशा सूचना महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी केले आहेत. सर्व घटकप्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रभारी अधिकाऱ्यांकडून त्याबाबत तातडीने कार्यवाही करुन घ्यावयाची आहे.
एफआयआरची नोंद ‘सीसीटीएनएसवर केली जात असताना हाताने डायरी लिहून ठेवण्याच्या पद्धतीमुळे वेळेच्या अपव्य होतो. त्यामुळे ही पद्धत पूर्णपणे बंद करण्याची सूचना करण्यात आल्या आहेत.- दत्ता पडसलगीकर (पोलीस महासंचालक)