मुंबई : दहीहंडीत न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन झाले तरी गुरुवारी पोलीस केवळ ‘बघ्याच्या’ भूमिकेत राहणार आहेत. मुंबईतील सर्व दहिकाला उत्सवांचे व्हिडिओ चित्रण केले जाणार असून पडताळणीनंतर कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे.पोलिसांनी शहर व उपनगरातील ३ हजार ३८७ मंडळांना दहीहंडीसाठी परवानगी दिली आहे. तो सुरळीतपणे पार पडण्यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.पोलीस आयुक्त कार्यालयातील प्रवक्ते अशोक दुधे म्हणाले, की दहीहंडीसाठी परवानगी देताना आयोजकांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन न करण्याची अट घालण्यात आली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांना उत्सव साजरा करावा लागणार आहे. उत्सवावर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. प्रत्येक ठिकाणचे व्हिडिओ शूटिंग केले जाणार आहे. त्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. १८ वर्षांखालील गोविंदा असल्यास किंवा २० फुटांहून अधिक उंच थर लावल्यास त्यावर तातडीने कारवाई केली जाणार नाही. त्याच्या चित्रणाची पडताळणी करून कोणत्या कलमानुसार कारवाई करायची आणि कोणाविरुद्ध गुन्हा दाखल करायचा याचा निर्णय होेईल. मुंबई पोलीस दलातील ९० टक्के मनुष्यबळ गुरुवारी तैनात असणार आहे. समाजकंटकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. नाकाबंदी करण्यात येत आहे. वाहतूक शाखेकडून विशेष बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
दहीहंडीवर पोलिसांचा ‘डिजिटल वॉच’
By admin | Published: August 25, 2016 5:04 AM