पुणे : महिलांना आपल्या समस्यांविषयी मोकळेपणाने बोलता यावे, त्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी पोलीस ठाण्यांच्या पातळीवर सुरू केलेल्या महिला दक्षता समित्या कागदावरच असल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मध्ये उघडकीस आला आहे. मदतीची याचना करणाऱ्या तरुणी म्हणून विचारूनही अनेक पोलीस ठाण्यांमध्ये दक्षता समिती अध्यक्षांचे नावही सांगण्यात आले नाही. भारती विद्यापीठ, मार्केट यार्ड, बंडगार्डन, लष्कर, कोरेगाव व समर्थ, हडपसर, मुंढवा, एमआयडीसी भोसरी, भोसरी, खडक पोलीस ठाणे आणि शिवाजीनगर, वारजे माळवाडी, फरासखाना, विश्रामबागवाडा या पोलीस ठाण्यांमध्ये कोणताही प्रतिसाद दिला गेला नाही. विश्रांतवाडी, खडकी, येरवडा, विमानतळ, कोंढवा, वानवडी या पोलीस ठाण्यांनी मात्र तातडीने दक्षता समिती अध्यक्षांचा दूरध्वनी दिला. महिलांवरील अत्याचार, हुंड्याची मागणी, सासरकडून होणारा छळ, पतीकडून होणारी मारहाण यांसारखे प्रश्न घेऊन महिला आल्या, तर अनेकदा त्यांना आपली बाजू मांडता येत नाही. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एक दक्षता समिती स्थापन केली जाते. या समितीमार्फत पीडित महिलांचे प्रश्न समजून घेऊन पती-पत्नीमधील भांडणे, घरगुती वाद सोडवले जातात. काही पोलीस ठाण्यांमध्ये महिला समिती कक्षाचे काम खरोखरीच चांगल्या प्रकारे होत असल्याचे समोर आले, तर काही ठिकाणी समिती प्रमुख कोण आहे, हेसुद्धा पोलिसांना माहीत नसल्याचे दिसले. स्वारगेट पोलीस स्टेशनच्या महिला पोलिसाला समिती प्रमुखांचे नाव विचारले असता त्यांनी सहायकाला विचारले, ‘आपल्याकडे महिला समितीचे काम कोण पाहतं रे? जरा बोर्डवर बघून ये.’ अशा प्रकारची परिस्थिती काही पोलीस स्टेशनमध्ये आहे. (प्रतिनिधी)1परिमंडळ क्रमांक ४ मधील विश्रांतवाडी, खडकी, येरवडा, विमानतळ, कोंढवा, हडपसर, वानवडी, मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये फोन करून समितीच्या प्रमुखांच्या दूरध्वनी क्रमांकाबद्दल विचारणा करण्यात आली. यापैकी हडपसर पोलीस ठाण्यात फोन केला असता दक्षता समिती अध्यक्षांचा क्रमांक दिला गेला नाहीच. ‘त्या आत्ता आराम करत असतील, तुम्ही त्यांना लगेच फोन कराल,’ अशी कारणे देऊन क्र मांक देण्याबाबत टाळाटाळ करण्यात आली. तातडीचे काम आहे असे सांगितल्यावर ‘तुम्ही उद्या पुन्हा फोन करा. मी तुम्हाला त्यांच्याशीच लगेच बोलायला देईन; परंतु आत्ता त्यांचा क्रमांक देऊ शकत नाही,’ असे सांगण्यात आले. मुंढवा ठाण्यामध्ये तर १०० क्रमांकावर फोन करून विचारा, असे सांगण्यात आले. 2भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये तर तुम्हाला येथे क्रमांक मिळणार नाही, पोलीस आयुक्त कार्यालयात फोन करा, असे सांगण्यात आले. भोसरी पोलीस ठाण्यात तर महिला पोलीस हवालदाराकडूनही पोलिसी खाक्या अनुभवयास मिळाला. फोन नंबर मागितला असता ‘काय काम होते?’ असे विचारत ‘आम्हाला सांगा, आम्हीपण इथे बसलेलो आहोत. आम्हाला काही तेवढेच काम नाही,’ असे म्हणत फोन कट करण्यात आला. 3खडक पोलीस ठाण्यातही अगदी तातडीचे काम असल्याचे सांगूनही ‘मला दुसरं काम आहे, तेवढेच काम नाही,’ असे म्हणून समस्या काय आहे, हे विचारण्याचीही तसदी घेतली गेली नाही. विश्रामबागवाडा पोलीस ठाण्यात ‘कशाला पाहिजे नंबर? मी पण एक महिलाच आहे. माझ्याशी बोला,’ असे सांगण्यात आले. तरीही आग्रह धरल्यावर खूप प्रयत्नानंतरही नंबर सांगण्यात आला नाही. थोडे अरेरावी केल्याने तुम्ही स्टेशनला येऊन बोला.वास्तविक एखाद्या महिलेला पोलिसांना माहिती सांगणे अवघड वाटत असेल, तर तिने दक्षता समितीच्या अध्यक्षांशी बोलणे अपेक्षित आहे. मात्र, कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फोन केला, तर ‘तुम्ही कोण बोलताय?, नाव काय?, कशासाठी नंबर हवाय?’ अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारले. आम्हाला नंबर देता येत नाही, असेही सांगण्यात आले. स्वारगेट पोलीस ठाण्यानेही १०० नंबरला फोन करून त्यांचा नंबर विचारा. आम्ही नंबर देऊ शकत नाही. पोलीस ठाण्यातच येऊन त्यांना भेटा, असे सांगण्यात आले. महिला पोलिसांनीही दाखविले नाही सौजन्य महिलांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठीच महिला दक्षता समितीची स्थापना करण्यात आली. महिलांना असणाऱ्या वैयक्तिक समस्या न्यायालयापर्यंत जाऊ न देता त्या सोडवण्याचे काम यामध्ये केले जाते. काही पोलीस स्टेशनमध्ये महिला पोलिसांनीच बोलताना थोडेही सौजन्य दाखविले नाही किंवा नंबर देण्यासाठी साह्यही केले नाही. पती-पत्नी वाद, कौटुंबिक वाद, प्रेमप्रकरणे, वाढणारी व्यसनाधीनता व ज्या महिलांवर अत्याचार झालेले आहेत, अशा महिलांसाठी दर शनिवारी समस्या निवारण दिन आयोजित करतो. यामध्ये प्रथम त्यांना स्वयंसेवी संस्थांमार्फत समुपदेशन (कौन्सिलिंग) करतो. या समितीमध्ये दहा ते पंधरा सदस्य असतात.- मीनल नाईक, महिला दक्षता समिती प्रमुख, वारजे माळवाडी महाविद्यालयात होणारी छेडछाड, घटस्फोटाचे वाढते प्रमाण, किशोरवयीन मुलांमधील प्रेमप्रकरणे अशा अनेक विषयांवरती आम्ही काम करतो. मुला-मुलींना आम्ही समजावून सांगतो. त्यांचे समुपदेशन करीत सल्लाही आम्ही विद्यार्थ्यांना देतो. त्यांच्या घरी जाऊन आम्ही पालकांना समजावून सांगतो. तसेच पती-पत्नींमधील होणारे वाद, त्यांनी घेतलेला घटस्फोटाचा निर्णय यावर आम्ही त्यांना परत एकदा विचार करा, असे समजावून सांगून नाते टिकविण्याचा प्रयत्न करतो. अशा अनेक केस आम्ही घटनास्थळी जाऊन सोडविल्या आहेत. आमचे मुख्य वैशिष्ट्य आम्ही तोडायचे नाही, जोडायचे काम करतो. त्यामध्ये आम्हाला यश आलेले आहे, असे त्यांनी सांगितले. - वृंदा विटकर, महिला दक्षता समिती प्रमुख, चतु:शृंगी पोलीस ठाणेमहिलांच्या समस्या जाणून घेऊन समुपदेशन करण्याचे काम केले जाते. काही वेळेस मुलींची चूक असली, तरी त्या मान्य करत नाहीत. अशा वेळी त्यांना चूक पटवून द्यावी लागते. घटस्फोटापर्यंत प्रकरण जाऊ न देता दोघांनाही एकत्र राहण्यासाठी मार्ग काढून देतो. तसेच सहा महिन्यांनी त्यांना फोन करून सर्व सुरळीत चालले आहे का, याची चौकशीदेखील आम्ही करतो.- प्रसन्ना नायरा, महिला समिती कक्ष प्रमुख, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनसमाजातील वाढती गुन्हेगारी, त्याचे स्वरूप व त्यावरील उपाय याबाबत महिला दक्षता समितीकडून समुपदेशन केले जाणार आहे. समाजातील दृष्ट प्रवृत्ती, अनिष्ट प्रथा, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तीला आळा घालून, सुजाण नागरिक बनवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. परंतु, या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक जण आपली जबाबदारी झटकू पाहत आहे. परंतु, आता सुदृढ समाज घडविण्याची जबाबदारी महिला दक्षता समितीने घेतली आहे. असे असताना पोलिसांना महिला दक्षता समितीविषयी आस्था असू नये, याला काय म्हणावे?महिला दक्षता समिती केवळ पती-पत्नी व कुटुंबातील वाद मिटविण्यापुरती न राहता तारुण्याच्या उंबरठ्यावरचं पहिलं पाऊल ते देशाचा भावी जाबबदार नागरिक म्हणून घडविण्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत असते. पण, व्यवस्थेने केलेल्या अवहेलनेमुळे मात्र महिला दक्षता समितीच्या अध्यक्ष व सदस्यांचेही काही चालत नाही. समाजातील चंगळवाद, वाढत राहणाऱ्या गरजा, गरीब व श्रीमंतांमधील वाढती दरी, समाजात पसरलेला भ्रष्टाचार, प्रसारमाध्यमांचा वाढता प्रभाव, स्त्रियांवरील अत्याचार, बलात्काराच्या वाढलेल्या घटना, बाबा, बुवा, भगतांकडून होणारे मानसिक, शारीरिक, आर्थिक शोषण, गुटखा, तंबाखू, दारू यांसारख्या व्यसनांचा तरुण पिढीला पडणारा विळखा, या सामाजिक वास्तवतेची परिस्थिती बदलण्यासाठी महिला दक्षता समिती एक महत्त्वाचे माध्यम आहे.