लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्यव्यापी पेट्रोलपंप घोटाळ्यामध्ये ठाणे पोलिसांना दुहेरी धक्का बसला. या प्रकरणातील पाच पंपमालक आरोपींचे जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने अखेर मंजूर केले असून नागपूर खंडपीठाने पोलिसांच्या तपासाला तात्पुरता ‘ब्रेक’ लावला आहे.यंत्रामध्ये हेराफेरी करून ग्राहकांना कमी इंधन देणाºया पेट्रोलपंपांवर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे अन्वेषण शाखेने जून महिन्यात मोठी कारवाई केली. या प्रकरणी ३३ आरोपींना अटक करण्यात आली असून ५७ आरोपींचा शोध सुरू आहे. या घोटाळ्याचा सूत्रधार प्रशांत नुलकर याला पोलिसांनी अटक केली होती. याशिवाय, त्याचा साथीदार विवेक शेट्ये यालाही अटक केली होती. या प्रकरणातील पंपमालकांची जामिनासाठी धावपळ सुरू होती. त्यापैकी जयदास सुकुर तारे, विपुल शांतिलाल देढिया, शिवशंकर रामकेदार दुबे, कामराज रामकेदार दुबे आणि सुशील इंद्रभान पाठक यांचे जामीन अर्ज ठाणे न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाकडे धाव घेतली होती. शुक्रवारी न्यायालयाने पाचही आरोपींचे जामीन अर्ज मंजूर केले.तपास थांबवापोलिसांना दुसरा धक्का उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला. सहा पेट्रोलपंपमालकांनी गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी खंडपीठापुढे याचिका दाखल केली होती. पेट्रोलपंप घोटाळ्याचा तपास पूर्णत: तांत्रिक स्वरूपाचा असल्याने तो सक्षम यंत्रणेमार्फत करावा, असा युक्तिवाद या वेळी करण्यात आला. न्यायालयाने तो ग्राह्य धरून पोलिसांना या प्रकरणाचा तपास तात्पुरता थांबवण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची सुनावणी अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे हा आदेश अंतिम नसल्याचे पोलीस अधिकाºयांनी सांगितले.
पेट्रोलपंप घोटाळ्यात पोलिसांना दुहेरी धक्का, मालकांना जामीन मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 5:24 AM