डिप्पी वांकाणी, मुंबईअॅग्नेलो वाल्डारीस या संशयिताचा पोलिसांच्या ताब्यात असताना मृत्यू झाल्याप्रकरणी राज्याच्या पोलीस महासंचालकांना युरोपभरातून आलेल्या शंभरावर फॅक्समुळे पोलीस संभ्रमात पडले आहेत. काही स्वयंसेवी संस्था जाणूनबुजून भारताविषयीचे मत कलुषित करण्यासाठी या सर्व प्रकरणात बनाव रचत असल्याचा संशय पोलिसांना आहे.वाल्डारीसला अन्य दोघा जणांसह मुंबईतील वडाळा जनरल रेल्वे पोलिसांनी चोरीच्या आरोपाखाली ताब्यात घेतले होते. त्याला न्यायालयात नेले जात असताना त्याने कथितरीत्या रेल्वे रुळांवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्याचा लोकल रेल्वेखाली सापडून मृत्यू झाला. मात्र त्याच्या बरोबरच्या आरोपींनी दावा केला की त्यांचा तुरुंगात पोलीस शारीरिक आणि लैंगिक छळ करत असत आणि त्याला गाडीखाली फेकून दिले गेले. वाल्डारीसच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने प्रथम हे प्रकरण गुन्हे शाखेकडे, नंतर सीआयडीकडे आणि बुधवारी सीबीआयकडे वर्ग केले. या प्रकरणी योग्य तपास करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणारे शंभराहून अधिक फॅक्स राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या नंबरवर युरोपभरातून आले आहेत. हे फॅक्स फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश आणि इंग्लिश भाषेत असून, जमर्नीतील म्युनिख, स्वित्झर्लंड, ब्रिटनमधील न्यू यॉर्कशॉयर आणि ब्रिस्टल तसेच इटली आणि स्पेनमधून आले आहेत. इंटेलिजन्स ब्युरोने (आयबी) एनजीओंना भारतविरोधी प्रचार करण्यासाठी परदेशातून पैसे मिळत आहेत यावर अहवाल दिला होता. त्यानंतर असा प्रकार झाल्याने त्याचे गांभीर्य वाढले आहे.
युरोपातून आलेल्या १०० फॅक्सने पोलीस संभ्रमात
By admin | Published: July 07, 2014 4:11 AM