ठाणे, दि. 7 - ठाण्यातील महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या आत्महत्ये प्रकरणी एसीपी निपुंजे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवल्यानंतर आता ज्या कॉन्स्टेबलबरोबर लग्न होणार होते त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे. आठवडयाभरापूर्वीच निपुंजे ठाणे पोलीस मुख्यालयात रुजू झाले आहेत.
ठाणे शहर पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या सारिका या पोलीस कॉन्स्टेबलच्या महिलेने बुधवारी दुपारी आत्महत्या केली. मूळ अहमदनगर जिल्ह्यातील असलेल्या सारिका या २०१४ मध्ये ठाणे शहर पोलीस दलात भरती झाल्या. प्रशिक्षणानंतर त्यांना ठाणे शहर आयुक्तालयातील मुख्यालयात नेमणूक मिळाली होती. दोन ते तीन सहकारी महिला कॉन्स्टेबलसमवेत कळव्यातील मनीषानगरमध्ये राहत होत्या.
बुधवारी दुपारी २ च्या सुमारास त्यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू असल्यामुळे रात्री ९ पर्यंत कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. घटनास्थळी चिठ्ठीही मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, उत्तरीय तपासणीसाठी तिचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून तिचे कुटुंबीय आल्यानंतर त्यांच्या ताब्यात हा मृतदेह दिला जाणार आहे.
दिवाळीत होते लग्न-पोलिसांच्या माहितीनुसार सारिका आणि तिचा भावी पती घरातच होते. फोन आल्यामुळे तो बाहेर पडला. त्याच वेळी तिने घरात हा गळफास घेतला. फोन झाल्यानंतर त्याने खिडकीतून आत पाहिले, त्या वेळी हा प्रकार त्याच्या निदर्शनास आला. अशी कोणती चर्चा झाली की, तो बाहेर गेल्यानंतर तिने इकडे आत्महत्या केली. या सर्वच बाबींचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांचे दिवाळीत लग्न होते.