पुणे : गस्तीवरील पोलिसांवर पाषाण टेकडीवर झालेला गोळीबार एअरगनमधून नव्हे, तर पिस्तुलामधूनच करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामधून जेरबंद करण्यात आलेल्या आरोपींकडून दोन गावठी पिस्तुलांसह पाच मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली होती. दशरथ महिपत कुशवाह (वय २४), मनीष बाबूलाल कुशवाह (वय १९) आणि सतीश बाबूलाल कुशवाह (वय २२, तिघे मूळ रा. मु. पो. दुंधी कपुरा, जि. मुरेना, मध्य प्रदेश, सध्या रा. धनकुडे चाळ, सर्व्हे नं. ७२, बाणेर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या घटनेत पोलीस हवालदार बबन मारुती गुंड, पोलीस शिपाई अमर अब्दुल शेख हे दोघे जखमी झाले होते. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सूस खिंड, पाषाण येथील टेकडीवर होणाऱ्या जबरी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गस्त वाढविण्यात आली होती. गस्तीदरम्यान या संशयितांकडे चौकशी करीत असताना एकाने एअरगन काढून हवालदार गुंड यांच्यावर गोळीबार केला होता, तर शेख यांच्याशी अन्य दोन चोरट्यांनी झटापट करीत त्यांच्या डोक्यात बंदुकीच्या बटने प्रहार केला होता. पोलिसांना हिसका देऊन आरोपी पसार झाले होते.दरम्यान, पोलिसांवर गोळीबार करणारे आरोपी मध्य प्रदेशात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अतिरिक्त आयुक्त शशिकांत शिंदे, उपायुक्त बसवराज तेली, सहायक आयुक्त वैशाली जाधव-माने, वरिष्ठ निरीक्षक दयानंद ढोमे, निरीक्षक (गुन्हे) उदय शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संदेश केंजळे, कर्मचारी सारस साळवी, अजय गायकवाड, प्रवीण पाटील यांच्या पथकाने मध्य प्रदेश महाराष्ट्र सीमेवरून आरोपींना जेरबंद केले. तपास सहायक निरीक्षक प्रमोद क्षीरसागर करीत आहेत. (प्रतिनिधी)पिस्तुलाचा धाक दाखवून तरुणाला लुटलेमुख्य आरोपी सतीश हा गेल्या चार वर्षांपासून पुण्यात राहत असून काही महिन्यांपूर्वी त्याने दोन भावांना पुण्यात बोलावून घेतले. मजुरी करणाऱ्या सतीशने एका भावाला मध्य प्रदेशातून गावठी कट्टा आणायला सांगितले होते. दशरथ २८ आॅगस्टला पिस्तुल घेऊन पुण्यात आला. पोलिसांवर गोळीबार करण्याच्या अर्धा तास आधी आरोपींनी हर्षल नारायण तुपे (वय २४) याला पिस्तुलाचा धाक दाखवत लुटले होते.
पोलिसांवर पिस्तुलामधूनच गोळीबार
By admin | Published: September 10, 2016 12:58 AM