ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ४ - मुंबईत दुचाकीस्वाराच्या मारहाणीत वाहतूक पोलिसाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, राज्यात पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. जबरी चोरीचे प्रकार घडत असलेल्या पाषाण टेकडीवर गस्तीसाठी गेलेल्या दोन पोलिसांवर संशयित चोरटयांनी एअर गनमधून गोळीबार केल्याची घटना शनिवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली.
यामध्ये एका पोलिसाच्या छातीला बरगडीजवळ छर्रा लागल्याने जखम झाली आहे. तर दुसऱ्या पोलिसाच्या डोक्यात बंदुकीने मारहाण केली आहे. पोलीस हवालदार बबन मारुती गुंड, पोलीस शिपाई अमर अब्दुल शेख अशी जखमींची नावे आहेत.
चतुःश्रुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सुस खिंड, पाषाण येथील टेकडीवर अलिकडच्या काळात जबरी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे या टेकडीवर पोलिसांची गस्त वाढवली आहे. शनिवारी रात्री हवालदार गुंड आणि शिपाई शेख टेकडीवर गस्तीसाठी गेले होते.
त्यावेळी तीन तरुण जाताना पोलीसांना दिसले. संशय आल्याने त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यांची अंगझडती घेताना आरोपींनी प्रतिकार केला. पळून जात असलेल्या आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एकाने एअर गन काढून हवालदार गुंड यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्या छातीला उजव्या बरगडीजवळ छर्रा लागल्याने जखम झाली आहे.
तर शेख यांच्याशी अन्य दोन चोरटयांनी झटापट करीत त्यांच्या डोक्यात बंदुकीच्या बटने प्रहार केला. पोलिसांना हिसका देऊन आरोपी पसार झाले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यानी घटनास्थळी धाव घेतली.