ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि. २९ : माओवाद्यांचा शहीद सप्ताह गुरुवार पासून सुरू झाला. जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर मोठा घातपात घडविण्याचा माओवाद्यांचा कट होता. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांनी पेरलेले तीस किलोची दोन स्फोटके जप्त करण्यात आली. यामुळे मोठी घटना घडविण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न फसला आहे.गडचिरोलीसह देशभरातल्या नक्षल प्रभावित भागात हिंसक घटना घडविण्यासाठी माओवाद्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यातूनच अनेक ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यालगत असलेल्या छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात माओवाद्यांनी स्फोटके पेरुन ठेवली आहेत. अतिसंवेदनशील भागात पोलिसांनी कोंबींग आपरेशन करतानाच अशी स्फोटके शोधण्याची मोहीम हातात घेतली आहे. त्यात गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या राजनांदगाव जिल्ह्यातल्या मानपूर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या औंधी ते सरखेडा दरम्यान रस्त्यावर पेरुन ठेवलेली वीस किलोची स्फोटकांची आयडी जप्त केली आहे.या स्फोटकांची क्षमता एक बस उडविण्याची असून ही स्फोटके निकामी करण्यात आली आहेत. तर जगदलपूर जिल्ह्यातही बिन्ता घाटीत पेरुन ठेवण्यात आलेली दहा किलोची स्फोटके पोलिसांनी जप्त करुन निकामी केली आहेत. एकूणच पोलिसांच्या सतर्कतेने मोठी घटना टाळण्यात यश आले आहे.