स्वत:वर गोळी झाडली : डीसीपीच्या बंगल्याच्या आवारात थरारनागपूर : कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस शिपायाने स्वत:च्या डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त विजय पवार यांच्या बंगल्याच्या आवारात आज सकाळी ११ च्या सुमारास ही थरारक घटना घडली. या घटनेमुळे पोलीस दलात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.सोनू श्रीधर पारखे (वय २५) असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. २०११ मध्ये पोलीस दलात भरती झालेला सोनू मुख्यालयात तैनातीला होता. तो मुळचा यवतमाळमधील रहिवासी आहे. त्याचे आई-वडील, भाऊ यवतमाळला संकटमोचन मार्गावर राहतात. ११ मे २०१४ ला त्याचे भावना प्रकाश काळे हिच्यासोबत आर्णी (जि. यवतमाळ) येथे लग्न झाले. भावनाची आई पोलीस दलात सहायक फौजदार (एएसआय) म्हणून कार्यरत आहे. सोनू नवविवाहित पत्नीसह पोलीस वसाहतीत राहायचा. विशेष शाखेचे उपायुक्त विजय पवार यांच्या बंगल्यावर सोनू काही दिवसांपासून ‘गार्ड ड्युटी’ करीत होता. बंगल्याच्या परिसरात असलेल्या छावणीत (तंबू) दिवसा दोन आणि रात्री दोन सशस्त्र पोलीस ड्युटीवर असतात. सोनूची आज डे (दिवसपाळी) होती. तो सकाळी ९.३० च्या सुमारास ड्युटीवर आला. नाईट करणारे कर्मचारी निघून गेले. सोनूसोबत ड्युटीवर असलेला कर्मचारी ११ च्या सुमारास छावणीतून बाजूला गेला अन् बंगल्याच्या परिसरात गोळी झाडल्याचा आवाज आला. त्यामुळे इतर पोलीस कर्मचारी छावणीकडे धावले. सोनू रक्ताच्या थारोळ्यात पलंगाच्या खाली पडून होता. त्याने एसएलआर बंदुकीची नळी गळ्यावर (हनवटीला) लावून बंदुकीचा चाप ओढला. त्यामुळे गोळी डोक्यातून आरपार निघाली. या थरारक घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली. माहिती कळताच सदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक जी. के. राठोड आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामावगैरे केल्यानंतर मृतदेह मेयोत रवाना केला. त्याच्या यवतमाळच्या नातेवाईकांना या घटनेची माहिती देऊन बोलावून घेण्यात आले. वरिष्ठांनाही माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलीस आयुक्त के. के. पाठक यांच्यासह सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सोनूने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली. त्याचा शोध घेण्यात येत आहे. सोनूच्या खिशात एक चिठ्ठी आढळली. त्यावरून घरगुती कारणामुळे सोनूने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी काढला. त्याची खदखद कळलीच नाहीडीसीपी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या काही वेळेपूर्वीच ते बंगल्यावरून कार्यालयाकडे आले होते. सोनू अडीच तीन महिन्यांपासून त्यांच्या बंगल्यावर कार्यरत होता. तो नेहमीच अबोल (शांत) राहायचा. त्याचा स्वभावच तसा असावा, असे समजून त्याच्याशी कुणी जास्त बोलत नव्हते. वरून शांत वाटणाऱ्या सोनूच्या मनात खदखद होती, ते अखेरपर्यंत कळलेच नसल्याचे पवार म्हणाले.
पोलीस शिपायाची आत्महत्या
By admin | Published: September 30, 2014 12:41 AM