नवी मुंबई : कामोठे येथील ज्वेलर्सवर दरोडय़ाप्रकरणी गुन्हे शाखा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. गुन्हेगारांनी कोणताही पुरावा मागे सोडलेला नसताना पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्यांना पकडले आहे. त्यापैकी एक जण पोलिसाचा मुलगा आहे.
कामोठे येथील नूतन ज्वेलर्सवर दरोडा पडल्याची घटना 9 ऑक्टोबर रोजी घडली होती. मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात तिघांनी पिस्तुलाचा धाक दाखवून दुकानातील 7क् तोळे सोन्याचे दागिने चोरले होते. परंतु तिघांनीही तोंडाला रुमाल बांधलेले असल्याने त्यांची ओळख पटलेली नव्हती. अखेर एक महिन्याच्या कसून तपासाअंती गुन्हे शाखा पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. सोमनाथ पांडुरंग दिसले (23), अजरुन रामकुमार टाक (27) आणि किशन गोरख करडे (2क्) अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी अजरुन टाक हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर ट्रॉम्बे, चेंबूरपोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तर किशन करडे हा पोलीस पुत्र असून त्याचे वडील मुंबई पोलीसमध्ये आहेत. किशन व सोमनाथ हे प्रथमच या गुन्हय़ात सहभागी झाले होते. हे तिघेही चेंबूरचे राहणारे आहेत.
नूतन ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यापूर्वी त्यांनी 15 दिवस तेथे पाळत ठेवली होती. त्यानुसार दरोडा टाकण्याच्या दिवशी त्यांनी नेरूळ येथील त्यांच्याच मैत्रिणीच्या भावाची मोटारसायकल बनावट चावीने पळवली होती. याच मोटारसायकलवर येऊन त्यांनी ज्वेलर्समध्ये लूट केली अशी माहिती गुन्हे शाखा पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली. सदर घटनेनंतर पोलिसांनी ज्वेलर्समधील सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. परंतु त्यांनी कोणताही पुरावा मागे ठेवलेला नव्हता. अखेर अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे गेल्या एक महिन्यापासून या प्रकरणाचा तपास सुरू होता. त्याद्वारे ज्वेलर्सच्या आवारात वावर झालेल्या सुमारे एक हजार व्यक्तींची माहिती पोलिसांनी मिळवली. त्यामधून या तिघांचा शोध घेऊन अत्यंत शिताफीने त्यांना अटक केली. त्यासाठी गुन्हे शाखा परिमंडळ 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिकराव पोळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर जगदाळे, उपनिरीक्षक किरण भोसले, दादा अवघडे, सहाय्यक उपनिरीक्षक प्रदीप देसाई यांचे पथक महिनाभर कार्यरत होते.तिघांकडून पोलिसांनी 191.43 ग्रॅम सोन्याचे दागिनेही जप्त केले आहेत. (प्रतिनिधी)