लोहारा (जि. उस्मानाबाद) : शिवसेनेचे खासदार रवी गायकवाड यांना तिकीट नाकारल्यानं त्यांचे समर्थक शनिवारी रात्री आंदोलनासाठी 'मातोश्री'कडे कूच करत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री एकच्या सुमारास त्यांना तुळजापूर येथे रोखून परत पिटाळले. मात्र तरीही गायकवाड समर्थकांनी इतर वाहनांची सोय करत मुंबईच्या दिशेनं प्रवास सुरू केला. गायकवाड समर्थक आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेऊन राजीनामे देणार आहेत. त्यामुळे आज मातोश्रीवर काय घडणार, याकडे लक्ष लागलं आहे.रवी गायकवाड यांना उमेदवारी न मिळाल्यानं त्यांच्या समर्थकांनी शनिवारी उमरगा येथे मेळावा घेतला. त्यात ठरल्याप्रमाणे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आपले राजीनामे देण्यासाठी व आंदोलनासाठी शनिवारी रात्री मुंबईकडे निघाले होते. दरम्यान, बसमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. पोलिसांना ही माहिती कळताच त्यांनी तुळजापूर येथे मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास या समर्थकांच्या बसेस अडवून त्यांना रोखलं. यानंतर त्यांना नोटीस बजावून परत पिटाळण्यात आलं. या नोटिसीत सकाळी आठच्या आधी गाव सोडू नये, अशी सूचना देण्यात आली होती. मात्र तरीही रातोरात इतर वाहनांची सोय करून अनेकांनी मुंबईच्या दिशेने कूच केली. त्यामुळे आज मुंबईत काय घडामोडी घडणार, याकडे शिवसैनिकांचं लक्ष लागलं आहे.शिवसेनेनं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी 22 मार्चला जाहीर केली. शिवसेनेनं आपल्या जवळपास सर्वच खासदारांना पुन्हा संधी दिली. मात्र उस्मानाबादचे खासदार प्रा. रविंद गायकवाड यांचं तिकीट कापण्यात आलं. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला विमानात चपलेनं मारहाण केल्यानं गायकवाड वादात सापडले होते. त्यामुळे त्यांच्याऐवजी पवनराजे निंबाळकर यांचे चिरंजीव ओमराजे निंबाळकर यांना तिकीट देण्यात आलं. गायकवाड यांना तिकीट नाकारण्यात आल्यानं त्यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले. काल गायकवाड समर्थकांनी पुढील भूमिका ठरवण्यासाठी उमरग्यात मेळावा घेतला. यावेळी गायकवाड यांच्या एका समर्थकानं अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. बाबा भोसले नावाच्या समर्थकानं ‘तिकिट पाहिजेच’ असा घोष करत सोबत आणलेल्या बाटलीतील रॉकेल अंगावर ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्त्यांनी या समर्थकास तातडीनं रोखलं. यानंतर स्थानिक पोलिसांनी मेळाव्याच्या ठिकाणी जमलेल्या काही इतर कार्यकर्त्यांकडूनही चार ते पाच रॉकेलच्या बाटल्या जप्त केल्या.
राजीनामे देण्यासाठी 'मातोश्री'कडे निघालेल्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी रोखलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 9:01 AM