मुंबई - काही दिवसांपूर्वी सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. अतिशय बिकट परिस्थिती सांगली जिल्ह्यातील काही गावांत निर्माण झाली होती. त्यातच बोट दुर्घनेत ब्रम्हनाळ येथे १६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पुरामधून वाचविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलीस आणि एनडीआरएफ यांनी कंबर कसली होती. अनेक पुरात अडकलेल्यांना या जवानांनी आपल्या जीवाची पर्वा न करता वाचविले. मात्र, पुरात रात्रंदिवस असल्यामुळे पुरग्रस्तांप्रमाणे पोलिसांचे हाल झाले. पाण्यात भिजून ताप आल्याने निमोनिया होऊन ऑन ड्युटी पोलीस राजाराम वाघमोडे यांचा मृत्यू झाला.
पुरामधून लोकांना वाचविता वाचविता स्वतःला ताप येऊन पोलीस कर्मचारी राजाराम पांडुरंग वाघमोडे यांना निमोनिया झाला. ऑन ड्यूटी असताना त्यांना चक्कर आली. त्यानंतर उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. पलूस येथे पूरग्रस्तांच्या मदतीला वाघमोडे हे आठवडाभर कार्यरत होते. राजाराम पांडुरंग वाघमोडे ऊर्फ राजू बापू हे गेल्या २५ वर्षांपासून अखंड पोलीस सेवेत कार्यरत होते. अखेरच्या काळात सांगली-कोल्हापूर येथे पूरग्रस्तांच्या सेवेकरिता आपले कर्तव्य बजावित असताना ही दुःखद घटना घडली आणि त्यांचा मृत्यू झाला. पूरकाळात पोलीस कर्मचारी वाघमोडे यांनी बजावलेले कर्तव्य वाखाणण्याजोगे आहे. त्यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी आणि २ मुले असा परिवार असून स्थानिक पोलिसांनी कुटुंबियांना मदत केली आहे.