संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला आज २२ वर्षे पूर्ण झाली. याच दिवशी लोकसभेत आज दोन घुसखोरांनी प्रेक्षक गॅलरीतून उड्या मारत स्मोक कँडल फोडले. यामुळे संसदेतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून खासदारही भितीच्या छायेत दिसत होते. अशातच संसदेबाहेर स्मोक कँडल फोडणाऱ्यांमध्ये महाराष्ट्राचा तरुण होता. यामुळे महाराष्ट्रातील पोलीस यंत्रणा संतर्क झाली असून लातुरात पोलिसांच्या हालचाली वाढल्या आहेत.
संसदेतील या घुसखोरीच्या घटनेचे पडसाद नागपुरमधील हिवाळी अधिवेशनातही उमटले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची माहिती सभागृहात दिली. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना फोन करत या तरुणाची माहिती काढण्याचे आदेश दिले आहेत.
हा तरुण कुठे राहतो, तो काय करतो, त्याची सोशल मीडियातील उपस्थिती, यामागचा उद्देश आदी गोष्टींची माहिती घेण्यास फडणवीसांनी सांगितले आहे. यानंतर लातुरात खळबळ उडाली असून चाकूर झरी गावतील अमोल शिंदे याने संसदेबाहेर स्मोक कँडल फोडले होते. त्याच्या घरी लातूर पोलिसांचे पथक निघाले आहे. अमोल शिंदे याचे कोणी नातेवाईक तिथे राहतात का? तो कोणत्या शहरात वास्तव्यास आहे आदीची माहिती हे पोलीस गोळा करणार आहेत.
आतापर्यंत चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यापैकी तिघे हे उत्तर भारतातील आहेत, तर अमोल हा महाराष्ट्रातील आहे. या लोकांशी अमोलचा संबंध कसा आला, तो कोणत्या संघटनेशी संबंधीत आहे का आदी गोष्टींचा तपास करण्याची जबाबदारी आता लातुर पोलिसांवर आली आहे.