मुंबई : कॉ. गोविंदराव पानसरे हत्याकांडाच्या तपासात महत्त्वाची भूमिका बजावणारे कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांची नागपूर येथे झालेली बदली अखेर रद्द करण्यात आली आहे.विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या कन्या कॉ. स्मिता पानसरे व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, देशमुख यांची बदली रद्द करण्याची मागणी केली. त्यानुसार, ही बदली तत्काळ रद्द करण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य करत तसे आदेश निर्गमित केले. या शिष्टमंडळात भाकपचे राज्य सचिव कॉ. प्रकाश रेड्डी, मुंबई कार्यकारिणी सदस्य कॉ. प्रकाश नार्वेकर, कॉ. राजन बावडेकर, कॉ. अशोक सूर्यवंशी, अॅड. कॉ. बन्सी सातपुते, कॉ. हेमंत बुट्टे आदींचा समावेश होता. पानसरे हत्या प्रकरणाचा तपास अतिशय संवेदनशील व महत्त्वाच्या टप्प्यावर असताना, सुरुवातीपासून या तपासात असणारे पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांची बदली झाल्याने, तपासावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता होती. ही बाब ध्यानात घेऊन दिवंगत कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या कुटुंबीयांनी व भारतीय कम्युनिष्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने देशमुख यांची बदली रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. सरकारने नेमलेल्या एसआयटीवर पूर्णवेळ व स्वतंत्र आयपीएस अधिकारी प्रमुख म्हणून नियुक्त करावा आणि त्यांच्या हाताखाली सक्षम पोलीस अधिकाऱ्यांचे पथक निर्माण करावे. त्याप्रमाणे, या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत या पथकातील अधिकाऱ्यांची बदली करू नये, असेही शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. या मागणीलाही मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली.
पानसरे हत्याकांड तपासातील पोलीस निरीक्षकाची बदली रद्द!
By admin | Published: June 01, 2016 4:28 AM