अहमदनगर : तपासकामातील निष्काळजी, राजकीय नेत्यांशी असलेल्या संबंधातून फोफावणाऱ्या गुन्हेगारीला संरक्षण दिल्याचा ठपका ठेवत शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित लकडे यांना पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी निलंबित केले आहे. शनिवारी मध्यरात्री त्यांच्या निलंबन आदेशावर शिक्कामोर्तब झाले.लकडे यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेशही गौतम यांनी दिले आहेत. बोधेगाव दूरक्षेत्रातील पोलीस नाईक दीपक कोलते यांची मुंगी शिवारात पिन्या उर्फ सुरेश कापसे या सराईत गुन्हेगाराने ३ फेब्रुवारीला धारधार शस्त्राने भोसकून हत्या केली होती. त्याच्या तपासात निष्काळजीपणा केल्याचा ठपका लकडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गुन्हेगारांना संरक्षण देणे, त्यांच्यासोबत पार्ट्यांमध्ये सहभागी होणे, राजकीय नेत्यांशी संबंध ठेवत वाळूतस्करीला संरक्षण देणे आदी आरोप लकडे यांच्यावर होते. पोलीस नाईक दीपक कोलते यांची हत्या झाल्यानंतर लकडे यांचे अनेक कारनामे बाहेर आले. पोलीस उपअधीक्षक वाय.डी. पाटील यांनी लकडे यांच्या कामकाजाची सखोल चौकशी केली. त्यामध्ये तथ्य आढळल्याने लकडे यांच्या निलंबनाची शिफारस करण्यात आली. (प्रतिनिधी)
पोलीस निरीक्षक निलंबित
By admin | Published: February 09, 2015 4:59 AM