लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सांताक्रुझमधील गृहनिर्माण सोसायटीत पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पत्नीची धारधार शस्त्राने मंगळवारी रात्री उशिरा हत्या करण्यात आली. ‘टायर्ड आॅफ हर, कॅच मी अॅण्ड हँग मी,’ असे वाक्य रक्ताने मृतदेहाजवळ लिहिलेले असून, त्यांचा मुलगा सिद्धांत हा बेपत्ता असल्याने त्याच्यावर संशय व्यक्त केला जात आहे.वाकोला पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. गणोरे हे सांताक्रुझ पूर्वेकडील प्रभात कॉलनीतील एजी पार्क सोसायटीत तीन वर्षांपासून पत्नी दीपाली आणि मुलगा सिद्धांतसह राहतात. खार पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या गणोरे यांनी शीना बोरा हत्या प्रकरणाच्या तपास पथकात काम केले आहे. त्यांची ताडदेव पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. मात्र अजून कार्यमुक्त करण्यात आलेले नाही.मंगळवारी रात्री ११ वाजता गणोरे घरी आले. तेव्हा दरवाजा बाहेरून बंद होता. पत्नी आणि मुलगा दोघांचाही मोबाइल लागत नसल्याने ते दोघे बाहेर गेले असल्याच्या विचाराने गणोरे खालीच बसून राहिले. बराच वेळ झाल्याने साडेबाराच्या सुमारास त्यांनी घराकडे धाव घेतली. घराशेजारील कचऱ्याच्या पेटीत त्यांना चावी सापडली. घरात प्रवेश केल्यानंतर पत्नीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. त्यांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षास ही माहिती दिली. दीपाली या उच्चशिक्षित होत्या. सिद्धांतनेही उच्च शिक्षण घ्यावे, यासाठी त्या आग्रही होत्या. सिद्धांतने इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला होता. मात्र तेथे अडचणी येत असल्याने नंतर त्यास वांद्रे येथील महाविद्यालयात टाकण्यात आले. तो ‘बी. एसस्सी’च्या पहिल्या वर्षाला आहे. तब्येत बरी नसल्याचे कारण सांगून गणोरे हे दुपारीच पोलीस ठाण्यातून निघाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र जाधव यांनी दिली. तर गणोरे यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीत ते रात्री ११ वाजता घरी आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे गणोरे नेमके कुठे गेले होते? ते केव्हा घरी आले? याचाही पोलीस तपास करत आहेत. दीपाली यांच्या मानेवर पाच, छातीवर तीन आणि हातावर एक असे एकूण नऊ वार करण्यात आले.दीपाली यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. घटनास्थळावरून चाकूही हस्तगत करण्यात आला आहे. तसेच सीसीटीव्ही फूटेजही ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक तपासात मुलावर संशय असून, त्याचा शोध सुरू आहे. मात्र केवळ त्यावरच न थांबता सर्व बाजूंनी तपास करण्यात येईल, असे वाकोला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ महादेव वावळे यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
By admin | Published: May 25, 2017 2:33 AM