ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १६ - आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील संगणक परिचालकांनी बुधवारी सकाळी विधानभवनावर काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले आहे. राज्यभरातून जवळपास १५ ते २० हजार संगणक परिचालक या मोर्चात सहभागी झाले आहेत.
सकाळी आठच्या सुमारास मोर्चा विधानभवनाजवळ येताच पोलिसांनी मोर्चाला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार केला. या लाठीमारात अनेक आंदोलक गंभीर जखमी झाले आहेत. काही पोलिसही जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या हिंसाचारामुळे या ठिकाणी तणावाची स्थिती आहे. या मोर्चासाठी मंगळवारी राज्यभरातून मोठया संख्येने संगणक परिचालक नागपूरात दाखल झाले होते. नागपूरमध्ये सध्या हिवाळी अधिवेशन सुरु आहे.