नाशिक : सोळा वर्षांपुर्वी वयाच्या २९व्या वर्षी पंजाब राज्यातील जिल्हा होशियारपूरच्या तांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका संशयित नराधमाने युवतीचे अपहरण करुन बलात्कार केल्याचा गुन्हा घडला होता. १९९८ सालापासून या गुन्ह्यातील संशयित आरोपी सुखदेव वनान सिंग(४५, रा.ओहरपूर,तांडा) फरार झाला होता. पंजाब पोलीस सातत्याने त्याच्या मागावर होते; मात्र सुखदेवसिंग हा त्यांच्या हातावर तुरी देत होता. काही वर्षांपुर्वी मुंबईमध्ये वास्तव्यास असलेल्या सुखदेवची बातमी पंजाब पोलिसांना मिळाली होती. पंजाब पोलिसांनी मुंबईमध्ये जाऊन सुखदेवला बेड्या ठोकण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना अपयश आले. सुखदेव तेथूनही पोलिसांच्या तावडीतून निसटला. त्यानंतर मागील दोन ते चार वर्षांपासून हा संशयित आरोपी नाशिकमधील देवळाली कॅम्प परिसरात वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती पंजाब पोलिसांनी मिळविली. पंजाब व हरियाणा आणि चंदीगढ न्यायालयाच्या आदेशान्वये सदर आरोपीला अटक करण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले होते. हे पथक नाशिकमध्ये येऊन धडकले. पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल व उपआयुक्त विजय मगर यांची पथकाने भेट घेऊन गुन्हयात फरार असलेल्या सुखदेवची माहिती सांगितली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या युनिट-२कडे याप्रकरणी जबाबदारी सोपविण्यात आली. पंजाब पोलिसांच्या पथकाकडून युनिटचे सहाय्यक पोलीस निरिक्षक गंगाधर देवडे यांनी संशयित फरार आरोपीची माहिती व छायचित्र मिळविले. त्यानुसार सर्व गोपनिय स्तरावर देवडे व त्यांच्या पथकाने माहिती घेत तपासाची चक्रे वेगाने फिरविली. सदर आरोपी लहवित परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार देवडे यांनी लहवित गावात जाऊन पोलीस पाटील यांना विश्वासात घेत त्यांच्या मदतीने एका प्रार्थनास्थळाच्या परिसरात संशयित आरोपी सुखदेव सिंग यास शिताफिने अटक केली. पंजाब पोलिसांच्या पथकप्रमुखानेही गुन्हे शोध पथकाच्या युनिट-१च्या पथकाच्या तपासाचे कौतुक केले. सोळा वर्षांपासून ज्या आरोपीचा शोध पंजाब पोलीस घेत होते त्या आरोपीला नाशिकच्या पोलिसांच्या मदतीने बेड्या ठोकण्यात यश आले. आरोपीला पंजाब पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
पंजाबमध्ये युवतीचे अपहरण-बलात्काराच्या गुन्ह्यात सोळा वर्षांपासून फरार असलेल्या नराधमाला गुन्हे शाखेकडून नाशकात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 3:00 PM
मागील दोन ते चार वर्षांपासून हा संशयित आरोपी नाशिकमधील देवळाली कॅम्प परिसरात वास्तव्यास असल्याची गुप्त माहिती पंजाब पोलिसांनी मिळविली. पंजाब व हरियाणा आणि चंदीगढ न्यायालयाच्या आदेशान्वये सदर आरोपीला अटक करण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले होते.
ठळक मुद्दे१९९८ सालापासून या गुन्ह्यातील संशयित आरोपी सुखदेव वनान सिंग फरार होता.चंदीगढ न्यायालयाच्या आदेशान्वये सदर आरोपीला अटक करण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त गुन्हे शाखेच्या युनिट-२कडे याप्रकरणी जबाबदारी सोपविण्यात आलीपंजाब पोलिसांच्या पथकप्रमुखानेही गुन्हे शोध युनिट-१च्या पथकाच्या तपासाचे कौतुक