गडचिरोली : नक्षलविरोधी अभियान राबवताना गुरुवारी एटापल्ली तालुक्यातील गट्टा हद्दीतील कुंजीमर्का-गुंडगुजर व भामरागड तालुक्यातील नारगुंडा पोलीस मदत केंद्रांतर्गत मत्तेमकुयी जंगलात पोलीस व नक्षल्यांमध्ये चकमकी उडाल्या.पोलीस व सीआरपीएफ जवान संयुक्तपणे कुंजीमर्का - गुंडगुजर परिसरात मोहीम राबवत असताना, गुरुवारी सकाळी बंदूकधारी नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने बेछूट गोळीबार केला. पोलिसांनीही नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार करीत प्रत्युत्तर दिले. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षल्यांनी पळ काढला. याच अभियानावरून परत येत असताना सकाळी ११.३०च्या दरम्यान नक्षल्यांनी बांधलेले बॅनर काढत असताना भूसुरूंगाचा स्फोट झाला. परंतु कोणतीही जीवितहानी झाली नाही. भामरागड तालुक्यातील नारगुंडा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत मुत्तेमकुयी जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवताना, गुरुवारी दुपारी १२.३० वाजता नक्षल व पोलिसांमध्ये चकमक उडाली. (प्रतिनिधी)
पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक
By admin | Published: October 07, 2016 6:04 AM