ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. २६ - शनिशिंगणापूरमध्ये चौथ-यावर जाऊन दर्शन घेण्याचा अधिकार महिलांना मिळायलाच हवा अशी मागणी करणा-या भूमाता ब्रिगेडच्या आंदोलक महिलांना सुपेगावाजवळ पोलीसांनी अडवले आहे. मोठ्या प्रमाणावर आलेल्या या महिलांनी तिथेच निदर्शने केली असून इतक्या लांब अडवायची काय गरज होती असा सवाल विचारला आहे.
आम्हाला दर्शनाला का बंदी असा सवाल य महिलांनी विचारला असून मार्ग अडवल्यामुळे रस्त्यावर ठिय्या मांडला आहे.
शनिशिंगणापूरातच जाऊन आंदोलन करण्यावर या महिला ठाम असून चौथ-यावर चढूनच दर्शन घेणार अशीही त्या मागणी करत आहेत.
दरम्यान, याआधी त्यामुळे भूमाता ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना पुढील आदेश मिळेपर्यंत चौथऱ्यावर दर्शनास प्रतिबंध करण्यात येत आहे. त्यांनी कोणत्याही प्रकारे जमाव जमवून मंदिराच्या आत प्रवेश करू नये, असे सहआयुक्त धर्मादाय यांनी स्पष्ट केले होते.
देवस्थानच्या संपत्तीचे नुकसान होऊ नये म्हणून ४०० महिलांना प्रवेश नाकारल्याची भूमिका सहआयुक्तांनी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. हा प्रश्न चर्चेने सुटावा अशी भावना सर्वसामान्य व्यक्त करत आहेत. दरम्यान, अंदोलन करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना महिला पोलिसांनी सुपे टोल नाक्याजवळ ताब्यात घेतले आहे, ७ बस आणि १५ कार मधून अंदोलन करणाऱ्या महिला आल्या होत्या.
आम्हाला शांततेत आंदोलन करायचे होते पोलिसांनी आम्हाला अडवून याला हिंसक वळण दिले अशी प्रतिक्रिया तृप्ती देसाई यांनी दिली आहे.
भूमाता ब्रिगेडच्या आंदोलना मुळे नगर -पुणे हाय वे वरील वाहतूक विस्कळीत, सुपे मार्गे वाहने वळविण्याचा प्रयत्न सुरु