नाशिक : महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वरच्या शिवमंदिरातील गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळण्यासाठी पुण्याहून निघालेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यासह कार्यकर्त्यांचा ताफा ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्याच्या सरहद्दीवर नांदूरशिंगोटेजवळ रोखला. त्र्यंबकेश्वरला गेल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी नोटीस पोलिसांनी त्यांना बजावली. मात्र, देसाई ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने पोलिसांनी बळाचा वापर करीत त्यांना ताब्यात घेतले.देसाई यांच्यासह छत्रपती ग्रुपच्या कार्यकर्त्यांचा १५ वाहनांचा ताफा सकाळीच पुण्याहून निघाला होता. त्यामुळे पोलिसांनी नांदूरशिंगोटेच्या पुढे बायपासजवळ बॅरिकेडस लावून नाकाबंदी केली होती. देसाई यांच्या गाड्यांचा ताफा सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास बायपासजवळ आला. पोलीस उपअधीक्षक दीपक गिऱ्हे यांनी त्र्यंबकेश्वरला जाण्याने तणाव निर्माण होईल, असे देसाई यांना सांगितले. सुमारे तासभर त्यावर चर्चा झाली. तोपर्यंत महिला कार्यकर्त्यांनी महामार्गावर ठिय्या दिला, त्या ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हत्या. त्यामुळे पोलीस वाहनांमधून सुमारे ५० महिला कार्यकर्त्यांना तात्पुरत्या स्वरूपात उभारलेल्या एका मंगल कार्यालयातील पोलीस चौकीत नेले.शिवसेनेची गांधीगिरीशिवसेनेने गांधीगिरीच्या मार्गाने ब्रिगेडला विरोध केला. पुष्पगुच्छ घेऊन आलेल्या शिवसैनिकांनी त्र्यंबकेश्वरला जाणे चुकीचे असल्याचे महिला कार्यकर्त्यांना सांगितले. साध्वीला प्रवेश नाकारलात्र्यंबकेवरमध्ये स्थानिक महिलांबरोबरच साध्वी हरसिद्धीगिरी यांनी मंदिरात प्रवेश केला. मात्र, त्यांना गर्भगृहात प्रवेश नाकारत बाहेर काढण्यात आले. मंदिर प्रशासनाशी संबंधित महिलांनी त्यांना बाहेर ढकलले. आपण जुना आखाड्याशी संबंधित असून, स्वामी हरिगिरीजी महाराज आपले गुरु असल्याचा दावा साध्वी हरसिद्धी यांनी केला.
भूमाता ब्रिगेडला पोलिसांनी नाशिकच्या सीमेवरच रोखले!
By admin | Published: March 08, 2016 3:00 AM