नारायणगाव : महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी महिला दक्षता समितीने पुढाकार घेऊन पोलिसांना सहकार्य करावे, तसेच नागरिक व पोलीस यांच्यातील महत्त्वाचा दुवा असलेल्या पोलीस पाटील यांनी गावातील सामाजिक व जातीय सलोखा राखून गावातील घडामोडीवर लक्ष ठेवून नेहमी सतर्क राहावे, असे आवाहन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी नारायणगाव येथे केले. नारायणगाव पोलीस ठाण्याच्या वतीने नारायणगावचे ग्रामदैवत मुक्ताबाई देवी यात्रेत बंदोबस्त, रात्रीच्या गस्तीवर कर्तव्य बजावल्याबद्दल पोलीसमित्रांना प्रमाणपत्र, १० वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, पोलीस पाटील, महिला दक्षता समिती यांची बैठक असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई, सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, डॉ. आनंद कुलकर्णी, मुख्याध्यापक एच. पी. नरसुडे, मुख्याध्यपिका अनघा जोशी, उपसरपंच जंगल कोल्हे, संतोष पाटे, संतोष वाजगे, बाबू पाटे, रमेश पांचाळ, महिला दक्षता समितीच्या वैजंयती कोऱ्हाळे, अॅड. माधवा पोटे, जयश्री खैरे, मनीषा पारेकर, पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते. जाधव म्हणाले, की पोलीस विभागाने महिला व सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिसाद या मोबाईल अॅप्सचा वापर करावा. पोलीस पाटलांनी गावात येणारा अनोळखी व संशयित व्यक्ती, परप्रांतीय यांची माहिती पोलिसांना कळवावी. गाव व परिसरातील घडणाऱ्या घटना वेळी बारकाईने लक्ष ठेवून पोलिसांना सहकार्य करावे, की जेणेकरून एखादी गंभीर घटना घडल्यास पोलिसांना तपास करताना मदत होईल. पोलीस पाटील पद हे महत्त्वाचे व जबाबदारीचे आहे. अनेक गावांतून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य होत नसल्याची खंत व्यक्त करून म्हणाले, की कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. पुस्तकी ज्ञानाने गुणवंत होण्याबरोबरच सामान्यज्ञान अवगत करून उच्च ध्येय बाळगा. तरुणांमध्ये सोशल मीडियाचा गैरवापर होऊन त्यातून अनेक गंभीर घटना घडत आहेत. या प्रसंगी मुख्याध्यापक एच. पी. नरसुडे यांनी मनोगत व्यक्त केले. नारायणगाव पोलिसांच्या कामाबाबत जाधव यांनी समाधान व्यक्त केले. पोलीस ठाण्याच्या आवारात आंबा, वड, पिंपळ, चाफा, गुलमोहर,कडुलिंब अशी विविध १०० झाडे जाधव व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. सू^त्रसंचालन प्रा. काशिनाथ आल्हाट यांनी केले. मुजावर यांनी आभार मानले.
पोलीस पाटलांनी जातीय सलोखा राखावा- जाधव
By admin | Published: June 27, 2016 1:23 AM