मुंबई : नियम व अटींची पूर्तता केली नसतानाही खोटा अहवाल सादर करून पोलिसांनी चार डान्सबारना तात्पुरत्या स्वरूपात परवानगी मिळवून दिल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी गृहविभागाने मुलुंड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ.अरुणकुमार लोहार, भांडुप पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन सूर्यवंशी, टिळकनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मनीषा शिर्के व ताडदेव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभ्यंकर यांना निलंबित केले आहे.डान्सबार बंदी उठविल्यानंतर बारमालकांनी पोलिसांकडे परवानगीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज केले आहेत. पहिल्या टप्प्यात इंडियाना (ताडदेव), नटराज (विद्याविहार), पद्मा पॅलेस (भांडुप), उमा पॅलेस (मुलुंड) या चार बारना तात्पुरत्या स्वरूपाचा परवाना देण्यात आला होता. या बारवर २०१४ ते मार्च २०१६दरम्यान ३ ते ४ वेळा समाजसेवा शाखेकडून कारवाई करण्यात आली होती. त्याच बारना परवानगी दिल्याचे लक्षात येताच मंगळवारी गृहविभागाचे प्रधानसचिव सतबीर सिंग यांनी चारही बारना भेट दिली. संबंधित पोलीस ठाण्यांकडून प्राप्त अहवालातील माहिती व प्रत्यक्षातील परिस्थितीत तफावत आढळल्याने सिंग यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार सीसीटीव्ही, अग्निरोधक यंत्रणा यांसारख्या ३ ते ४ बाबींची कमतरता दिसून आली. पोलिसांनी बारमालकांच्या संगनमताने त्रुटी असतानाही त्याकडे दुर्लक्ष करत खोटा अहवाल सादर करून त्यांना परवानगी दिल्याचे दिसून आले. त्यामुळे संंबंधित पोलीस ठाण्यांतील पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)- या प्रकरणी कामामध्ये निष्काळजीपणा दाखवत चुकीचा अहवाल सादर केल्याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्याच्या तीन पोलीस निरीक्षकांसह एका सहायक पोलीस निरीक्षकाला निलंबित केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या टिष्ट्वटर अकाउंटवरून जाहीर केले.
‘डान्सबार’ला परवानगी देणारे पोलीस निलंबित
By admin | Published: March 19, 2016 2:11 AM