मुंबई - महाराष्ट्रात पोलिस भरतीत मोठा घोटाळा झाला असल्याचे आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. राजकीय वशीलेबाजीने अपात्र कर्मचाऱ्यांची पोलीस उपनिरिक्षकपदावर (PSI) बढती करण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याकडून लाच सुद्धा घेण्यात आली असल्याचा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपावरून पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
सरकराने अपात्र ६३६ हवलदारांना पीएसआय म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे एमपीएससी अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत अपात्र ठरवलेल्यांना पात्र ठरवण्याचा अधिकारी सरकारला नाही, असे आव्हाड म्हणाले. मात्र, राजकीय वशीलेबाजीने ह्या अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली असल्याचा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला आहे. दिवस रात्र मेहनत करत असलेल्या तरूणांचे अधिकारी होण्याचे स्वप्न सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे धुळीला मिळाले असल्याचे आव्हाड म्हणाले.
सरकराने बढती केलेल्या ६३६ जणांकडून पैसे घेतले असल्याचे आरोप आव्हाड यांनी केला. वेटिंग लिस्टमध्ये असलेल्यांना पात्र करून आत घेण्याचा प्रकार मागील ७० वर्षात कधीच झाला नसल्याचे आव्हाड म्हणाले. पोलीस दलातील हा सर्वात मोठा आणि अशोभनीय घोटाळा असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे.