विशाल शिर्के, पुणेशहरातील ३७७ पोलिसांना चुकीच्या पद्धतीने बढती दिल्याचे उघड झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांची पदावनती करण्याची नामुष्की पोलीस खात्यावर आली आहे. या निर्णयामुळे सहायक पोलीस फौजदार, पोलीस हवालदार व पोलीस नाईक या पदांना फटका बसला. पदावनती झालेल्या सर्व पोलिसांना पुन्हा बढती दिल्याचा दावा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केला असला, तरी एकूणच पदोन्नती प्रक्रियेत गोंधळ झाल्याचे स्पष्ट होत आहे. पोलीस महसंचालकांच्या आदेशानुसार बढती प्रक्रिया रद्द केली आहे. तसे गोपनीय गॅझेट २० आॅगस्ट २०१४ रोजी पोलीस दलाने काढले असून, त्याची प्रत ‘लोकमत’ला प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र शासनाने १९ सप्टेंबर २००१ च्या परिपत्रकानुसार राज्य राखीव पोलीस दल व इतर घटकांतून पोलीस खात्यात बदलून आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची सुधारित ज्येष्ठता यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र सध्या कार्यरत असलेल्या पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता डावलून पदोन्नती देण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना पदावनत करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. परिणामी साहाय्यक पोलीस फौजदार म्हणून पदोन्नती दिलेल्या १३२ जणांना हवालदार म्हणून, तर पोलीस हवालदार म्हणून पदोन्नती दिलेल्या १३२ जणांना पोलीस नाईक पदावर पदावनत करण्यात आले आहे. तसेच पोलीस नाईकपदी बढती दिलेल्या ११३ जणांना पोलीस शिपाई म्हणून पदावनत करण्याचा आदेश देण्यात आला आहे. यातील अनेक जण चार वर्षांपर्यंत पदोन्नतीच्या पदावर होते. पण आता त्यांच्यावर पुन्हा कनिष्ठ पदावर काम करण्याची वेळ आली आहे.
पुण्यात पोलीस पदोन्नतीत गोंधळ
By admin | Published: February 26, 2015 2:23 AM