- लक्ष्मण मोरे, पुणेखेळाडू कोट्यातून भरती झालेल्या काही पोलीस अधिकाऱ्यांची क्रीडा नैपुण्याची प्रमाणपत्रे बनावट असल्याचे न्यायालयीन प्रकरणात उघड झाल्यानंतर गेल्या काही वर्षांत या कोट्यातून नियुक्त झालेल्या १५३ अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची शहानिशा सुरू झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपनिरीक्षक पदासाठीची भरती प्रक्रिया राबवली जाते. यामध्ये खेळाडूंसाठी आरक्षण ठेवण्यात येते. २००७ ते २०१३ दरम्यान या आरक्षणामधून १५३ पोलीस उपनिरीक्षक आणि सहायक निरीक्षक दर्जाचे अधिकारी पोलीस दलात भरती झाले. मात्र, आता त्यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या प्रमाणपत्रांची सत्यता पडताळण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि अधीक्षक कार्यालयांना त्यांच्या आस्थापनेवरील उपनिरीक्षक व सहायक निरीक्षकांची माहिती आणि त्यांनी भरती होताना सादर केलेले प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. क्रीडा संचालनालयामार्फत अधिकाऱ्यांच्या क्रीडा प्रमाणपत्रांची पडताळणी सुरू केली आहे. (प्रतिनिधी)
खेळाडू कोट्यातील पोलीस भरतीची चौकशी
By admin | Published: February 21, 2016 1:19 AM