प्रशांत ननवरे -
बारामती : महाराष्ट्र पोलीस भरतीमधील विद्यार्थ्यांनी भरती प्रक्रियेचे अर्ज भरून ५ महिने उलटले आहेत. मात्र, अद्यापदेखील भरती प्रक्रिया न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याची भावना वाढीस लागली आहे. पोलीस भरती प्रक्रियेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सप्टेंबर २०१९ मध्येच पूर्ण झाली आहे. एकूण ३,४५० पोलीस शिपाईपदांसाठी ही भरती प्रक्रिया आहे. त्याअनुषंगाने अद्यापर्यंत लेखी परीक्षा, मैदानी चाचणी झालेली नाही; त्यामुळे विद्यार्थ्यांना ही प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. वास्तविक, पोलीस भरतीच्या आजपर्यंतच्या इतिहासात ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर एका महिन्याच्या आत मैदानी चाचणी, लेखी परीक्षा सुरू होत असल्याचा अनुभव आहे. मात्र, या अनुभवाला प्रथमच छेद गेला आहे. ही प्रक्रिया ५ महिन्यांनंतरदेखील ठप्प आहे.याशिवाय, पोलीस भरती प्रक्रिया सुरू करताना मैदानी चाचणी, लेखी परीक्षेचा क्रम अद्याप शासनाने जाहीर केलेला नाही. हा क्रम जाहीर नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था कायम आहे. विद्यार्थी अक्षरश: निर्णयाच्या प्रतीक्षेत हवालदिल झाले आहेत. त्या वेळी जाहीर केलेल्या पोलीस भरतीबाबतची जाहिरात महायुती शासनाच्या काळात आॅगस्ट-सप्टेंबर २०१९ मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या वेळी महापोर्टलनुसार प्रथम आॅनलाईन, त्यानंतर मैदानी चाचणी घेण्याचा क्रम ठरला होता. मात्र, नवीन आलेल्या महाआघाडी शासनाने महापोर्टल स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असणाºया संभ्रमासाठी परीक्षेचा क्रम कारणीभूत ठरत आहे. राज्य शासनाने कोणतेही परिपत्रक काढून भरतीची माहिती देण्याची गरज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना भरती प्रक्रियेचा सराव करणे सोपे जाणार आहे.याबाबत येथील सह्याद्री अॅकॅडमीचे संचालक उमेश रूपनवर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की शासनाने कमी जागांसाठी भरती प्रक्रिया घेतलेली आहे. विद्यार्थ्यांचा संंभ्रम दूर करण्यासाठी शासनाने भरती प्रक्रिया लवकर जाहीर करून भरतीचे स्वरूप स्पष्ट करावे. शासनाने महापोर्टल स्थगित करण्याचा घेतलला निर्णय स्वागतार्ह आहे; मात्र तो निर्णय रद्द केल्यानंतरच विद्यार्थ्यांना न्याय मिळेल. ..........
२०१८ पासून भरती झालेली नाही.भरती प्रक्रिया कधी सुरू होणार, याबाबत विद्यार्थ्यांसह पालकांनादेखील उत्सुकता आहे. राज्यात सुमारे ८ ते ९ लाख विद्यार्थी राज्यातील विविध शहरांत भरतीसाठी तयारी करीत आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासिका लावल्या आहेत. अनेक विद्यार्थी वसतिगृह आणि खासगी ठिकाणी राहून तयारी करीत आहेत. ............2खानावळ, राहणे, तयारी, पुस्तके, अभ्यासाचा विद्यार्थ्यांना किमान प्रत्येकी ४ ते ५ हजार रुपये प्रतिमहिना खर्च येत आहे. त्यातच अजून भरती प्रक्रिया जाहीर झाली नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकही आर्थिक चिंतेत आहेत. राज्यात मार्च २०१८ नंतर पोलीस भरती झालेली नाही.