- जमीर काझी, मुंबईसाप्ताहिक सुटीच्या दिवशी काम केलेल्या पोलिसांना एक दिवसाचा पगार देण्याच्या मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या घोषणेची अंमलबजावणी करण्याला गृह विभागाला अखेर आठ महिन्यांनंतर मुहूर्त मिळाला आहे. सुटीच्या दिवशी काम केल्याबद्दल एक दिवसाचे वेतन देण्याचे आदेश लागू करण्यात आले असले, तरी वर्षात केवळ आठ वेळा त्यांना हा मोबदला घेता येणार आहे. त्यामुळे दोन लाखांवर पोलीस या निर्णयामुळे आनंदित झाले असले, तरी त्यातील अटीमुळे पूर्ण संतुष्ट झालेले नाहीत. सुटीदिवशी काम केल्यास पूर्ण पगार देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याबाबतच्या प्रस्तावावर सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्याने आता तो लागू केला आहे. तब्बल ११ वर्षांनंतर पोलिसांच्या या दैनिक भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली असून, गेल्या एक एप्रिलपासून त्याचा लाभ दिला जाणार असल्याचे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.विविध उत्सव, निवडणूका, अति महत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे, सभेच्या वेळी सुरक्षेच्या दृष्टीने बंदोबस्तासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध असावे, यासाठी वर्षातील किमान ७-८ महिने पोलिसांच्या साप्ताहिक सुटीवर गंडातर आणले जाते. अत्यावश्यक बाब म्हणून त्यांच्या सुट्या रद्द केल्या जातात. त्या बदल्यात त्यांना त्यांच्या वेतनश्रेणीनुसार दैनिक भत्ता देण्यात येत होता. मात्र त्याची रक्कम सरासरी ६० ते १०० रुपये इतकी अल्प होती. २००४ पासून त्याच्या दरामध्ये वाढ झालेली नव्हती. त्याबाबत वारंवार मागणी करूनही आघाडी सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलेले होते. अखेर युती सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांना न्याय मिळाला. (प्रतिनिधी)सुटीच्या दिवशी काम केल्यास त्यांना पूर्ण एक दिवसाचे वेतन देण्याची घोषणा केली होती. मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे तब्बल आठ महिन्यांपासून या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नव्हती. त्यामुळे याबाबत पोलीस वर्तुळात प्रचंड उत्कंठा लागून राहिली होती. अखेर सर्व बाबींचे सोपस्कार पूर्ण झाल्याने हा निर्णय लागू करण्यात आला असून, मूळ वेतन अधिक भत्ते दिले जाणार आहेत.
पोलिसांना आठ सुट्यांचा मोबदला
By admin | Published: August 09, 2015 3:02 AM