नागपूर : हिंसाचारास बळी पडलेल्या महिला व मुलींना अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी हैदराबादच्या धर्तीवर राज्यातील पहिल्यावहिल्या ‘भरोसा सेल’चे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केले. नागपूरमध्ये सेवेसाठी १०९१ क्रमांकाची ही हेल्पलाईन आहे. तसेच १०० क्रमांकावर फोनवरून तक्रारी स्वीकारल्या जातील.‘भरोसा सेल’द्वारे पीडित महिलांना मानसिक बळ प्राप्त होईल. नागपूरसारखीच राज्यात इतर ठिकाणीही ‘भरोसा सेल’ची निर्मिती करण्याचा विचार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, माहिती व तंत्रज्ञानामुळे हिंसेचे स्वरूप बदलत आहे. त्यामुळे पोलिसांनी जास्तीत जास्त तंत्रज्ञान अवगत करून घेण्याची गरज आहे. या तंत्रज्ञानाच्या बळावरच आम्ही पीडितांना न्याय देऊन गुन्हेगारी नियंत्रित करू शकतो. त्यातून कायद्याचा धाक निर्माण करू शकतो. पोलीस जनतेच्या मदतीकरिता आहे, हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे. तर नितीन गडकरी म्हणाले की, कायद्याचा आदर आणि धाक असणे गरजेचे आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी. कोणत्याही तक्रारीवर निर्णय घेण्यापूर्वी समेट घडवण्यावर भर द्यावा. आधी समेट आणि नंतर कायदा हे धोरण पोलिसांनी ठेवावे, अशी सूचनाही त्यांनी केली. (प्रतिनिधी)
पीडितेला पोलिसांचा ‘भरोसा’
By admin | Published: January 02, 2017 5:14 AM