ऑनलाइन लोकमत
चिपळूण, दि. १ - 'झी मराठी' वाहिनीवरुन प्रसारीत होणा-या 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेविरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. या मालिकेतून भूत-प्रेत आत्म्यांसारख्या अंधश्रध्दांना खतपाणी मिळत असल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे.
मागच्या आठवडयापासून सुरु झालेल्या या मालिकेत कोकणातील नाईक कुटुंबाची कथा दाखवण्यात आली आहे. या कुटुंबाभोवती एक गूढ असून, काही अदृश्य शक्तींमुळे ब-याचवर्षांपासून या कुटुंबात कुठलेही मंगल कार्य झाले नसल्याचे मालिकेत दाखवण्यात आले आहे.
या कुटुंबातील एका मुलाचा साखरपुडा होणार असतो. त्याची लगबग सुरु असते. मात्र त्यापूर्वीच कुटुंबप्रमुखाचे अचानक निधन होते आणि त्यानंतर एकपाठोपाठ एक धक्कादायक घटनांची मालिका सुरु होते. या मालिकेच्या माध्यमातून कोकणाची बदनामी सुरु असल्याचा तक्रारकर्त्याचा आक्षेप आहे. अंधश्रध्दा निर्मूलन कायद्यातंर्गत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.