लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये पोलिसांनी मनाई आदेश लागू केला असून सार्वजनिक ठिकाणी रात्री ते सकाळ दरम्यान ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई केली आहे . थर्टी फस्टच्या अनुषंगाने ध्वनी प्रदूषणासह कोरोना संसर्ग नियमांचे उल्लंघन रोखण्याचे आव्हान पोलिसां समोर असून विशेषतः वन परिसरातील पार्ट्याना पोलिसांनी लगाम घालण्याची मागणी होत आहे .
मीरा भाईंदर महापालिका हद्दीत पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांनी कलम हा १४४ नुसार मनाई आदेश लागू केले आहेत . मनाई आदेशासह ओमायक्रोन व्हेरियंट मुळे कोरोना संसर्ग पुन्हा झपाट्याने पसरू लागल्याने नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे . सार्वजनिक ठिकाणी रात्री ९ ते सकाळी ६ वाजे पर्यंत ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावर बंदी घातली आहे . बंदीस्त जागेच्या ठिकाणी आयोजित विवाह समारंभास जास्तीत जास्त १०० लोक आणि मोकळया जागेच्या ठिकाणी २५० लोक तसेच एकूण मर्यादेच्या २५ टक्के यापैकी जी मर्यादा संख्या कमी असेल इतकेच लोक उपस्थित राहु शकतील. सामाजिक, राजकिय, धार्मिक कार्यक्रम किंवा मेळाव्यात बंदीस्त सभागृहात जास्तीत जास्त १०० लोक आणि मोकळ्या जागेच्या ठिकाणी २५० लोक किंवा उपस्थिती क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जी संख्या कमी असेल इतक्याच लोकांना परवानगी असेल .
क्रिडा कार्यक्रम व स्पर्धांकरिता आसन क्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त लोकांना उपस्थित राहता येणार नाही . इतर कार्यक्रमांकरिता बंदिस्त सभागृहाच्या क्षमतेच्या ५० टक्के पेक्षा जास्त नसेल तसेच खुल्या मैदानात क्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त नसेल. तर उपहारगृहे, स्पा, चित्रपट व नाटयगृहे, व्यायामशाळा या आस्थापना ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील. उपहारगृह मालकांना एकूण आसन क्षमतेविषयी माहिती ठळकपणे प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे असे आदेशात म्हटले आहे . जगभरात गेल्या काही दिवसांमध्ये सर्वात वेगाने कोराना विषाणुचा ओमिक्रॉन व्हेरीयंट समोर आला असून अमेरिका, युरोप सह जगातील अनेक देशां मध्ये पसरला असल्याने पोलिसांनी दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा उपायुक्तांनी दिला आहे .
दरम्यान शहरातील मोठ्या प्रमाणात संरक्षित असलेल्या कांदळवन क्षेत्र व परिसर तसेच काजूपाडा , चेणे, वरसावे व घोडबंदर परिसरातील वन हद्दी लगतच्या इको सेन्सेटिव्ह झोन आणि उत्तन पाली , चौक , डोंगरी ह्या हरित पट्ट्यातील चालणाऱ्या पार्ट्याना वेसण घालण्याची मागणी होत आहे . ह्या भागात वन्य पशु - पक्षींचा वावर असल्याने या ठिकाणी अश्या कार्यक्रमां सह ध्वनी क्षेपक, लेझर लाईट, फटाके फोडणे आदींना परवानगी न देण्याची मागणी पर्यावरणासाठी कार्य करणारे सचिन जांभळे, रुपाली श्रीवास्तव सह जागरूक नागरिकांनी केली आहे . ह्या भागात पोलिसांनी गस्त वाढवण्यासह प्रतिबंधात्मक आदेश बजावावेत जेणे करून या ठिकाणी होणारे उल्लंघन रोखता येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे .