बारामती : ‘मी सज्ञान आहे. मला सनातन आश्रमातच साधना करायची आहे. मला वाटले तर नोकरी करेन किंवा आईवडिलांकडे येईन. मात्र आईवडिलांनी पोलिसांकडे दिलेला अर्ज चुकीचा असून, सध्या तरी त्यांच्याकडे मला यायचे नाही, अशी भूमिका शीतलने पोलिसांकडे मांडली आहे. तिने असे लेखी निवेदन दिल्यामुळे तिला आणण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले. ‘सनातन’च्या पनवेल येथील आश्रमात असलेल्या शीतल चिंचकर या तरुणीला आणण्यासाठी बारामतीचे पोलीस पथक गेले होते. या पथकाने तिला आईवडिलांनी केलेल्या अर्जाची माहिती दिली; मात्र तिने घरी परतण्यास स्पष्ट नकार दिला. आपल्याला सनातनने जबरदस्तीने ठेवल्याचा आरोप खोटा असल्याचे तिने म्हटले. आईवडिलांनी केलेला अर्ज अयोग्य आहे, असा तिचा दावा असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी दिली. तिच्या आईवडिलांना मात्र आपली मुलगी परत येईल, अशी आशा आहे. त्यासाठी ते सतत प्रयत्न करीत आहेत. (प्रतिनिधी)कोणताही धर्म मुलांपासून आईवडिलांना तोडत नाही. आम्ही काबाडकष्ट करून आमच्या मुलींना वाढविले, शिक्षण दिले ते त्यांचे समाधानी आयुष्य पाहण्यासाठीच; तिला सनातनच्या ताब्यात देण्यासाठी नाही. नांदायला गेलेल्या मुलीलासुद्धा माहेरची आठवण येते. मात्र ती आमच्या कोणत्याही कौटुंबिक कार्यात सहभागी होत नाही. - शोभा चिंचकर, शीतलची आई
पोलीस रिकाम्या हाताने परतले
By admin | Published: October 06, 2015 2:18 AM