जत (जि. सांगली) : मोक्कांतर्गत कारवाई झाल्यानंतर फरार झालेला दत्ता जाधव (४५, रा. सातारा) या कुख्यात गुंडाला पकडण्यास गेलेल्या सातारा व सांगली पोलिसांच्या पथकावर मंगळवारी रात्री प्रतापूर (ता. जत) येथे प्राणघातक हल्ला करण्यात आला. यावेळी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करून जाधव व साथीदार पसार झाले.याप्रकरणी वीसजणांविरोधात जत पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, दहाजणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेत सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, तीन वाहनांचे नुकसान झाले आहे.दत्ता जाधव याच्याविरोधात विविध स्वरूपाचे पंधरा गुन्हे दाखल आहेत. सहा महिन्यांपूर्वी त्याच्यावर मोक्कांतर्गत कारवाई झाली. तेव्हापासून तो फरार होता. प्रतापूर येथे मंगळवारी उरूस होता. त्यासाठी तो येणार असल्याची माहिती खबºयाकडून मिळाली. मंगळवारी रात्री सांगली व सातारा पोलिसांच्या पथकाने प्रतापूर येथे सापळा रचला. दत्ता जाधव वेषांतर करून गावात आला होता. यात्रेत तमाशाचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. सातारा येथील प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, जतचे विभागीय पोलीस उपअधीक्षक नागनाथ वाकुडे यांच्यासह सव्वाशे पोलिसांचा फौजफाटा सहा वाहनांमधून आला होता.
साताऱ्याच्या टोळीचा पोलिसांवर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:06 AM