पळसदेव : भिगवण (ता. इंदापूर) येथे शुक्रवारी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अंगावर धनगर समाजाच्या कार्यकत्र्यानी शाई फेकली होती. त्यामुळे त्यांच्या डाव्या डोळ्याला इजा झाली. या घटनेचे पडसाद भिगवणसह सर्वत्र उमटले होते.
शुक्रवारी संपूर्ण भिगवण बंद होते अन् तणावही होता. मात्र, शनिवारी भिगवणमध्ये सर्व व्यवहार सुरळीत चालू होते. असे असले तरी पोलीस बंदोबस्त मात्र कायम ठेवण्यात आला होता. मदनवाडी, चौफुला येथे पोलिसांची अधिक संख्या तैनात होती. त्यामुळे वातावरण शांत असले तरी काही अंशी तणाव जाणवत होता. शुक्रवारी भिगवण येथे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अंगावर धनगर समाजाच्या कार्यकत्र्यानी शाई फेकल्याचे समजताच काँग्रेसचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले होते. रास्ता रोको आंदोलन, त्यानंतर काँग्रेस कार्यकत्र्यानी काढलेली निषेध फेरी यामुळे भिगवणमध्ये तणावाचे वातावरण होते.
शुक्रवारच्या बंदनंतर शनिवारी भिगवणमधील व्यवहार सुरळीत चालु होता. बाजारपेठा उघडल्या होत्या. असे असले तरी पोलीस बंदोबस्त मात्र अधिक होता. अनेक ठिकाणी पोलीस गस्त घालत होते. मदनवाडी,चौफुला येथे तर पोलिसांच्या मोठय़ा दोन व्हॅन उभ्या होत्या.
कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस सतत सतर्क असल्याचे दिसत होते. साध्या वेशात पोलीसही दिसत होते. मात्र वातावरण शांततापूर्ण होते. (वार्ताहर)
डाळजला रास्ता-रोको झाले. हर्षवर्धन पाटील यांच्या अंगावर शाई फेकल्याच्या निषेधार्थ शनिवारी डाळज नं. 3 येथे काँग्रेस कार्यकर्ते, ग्रामस्थ यांच्या वतीने सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात कर्मयोगीचे संचालक गजानन जगताप, संजय जगताप, तानाजी जगताप, अप्पा वाकळे, लतीफभाई मुलाणी, भिगवणचे सरपंच पराग जाधव, बोगावत, महेंद्र जगताप, संजय विठ्ठल जगताप आदी सहभागी झाले होते. जवळपास अर्धा तास महामार्ग रोखून धरला होता. ग्रामस्थांच्या वतीने भिगवणचे सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर कार्यकत्र्यानी आंदोलन मागे घेतले.
शाईफेक हल्ल्याची सीआयडी चौकशी करा
इंदापूर : हर्षवर्धन पाटील शाईफेक प्रकरणाची सीआयडी खात्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड़ कृष्णाजी यादव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मयूर पाटील, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शेखर पाटील, बाळासाहेब डोंबाळे पाटील, प्रशांत पाटील व इतर प्रमुख कार्यकत्र्याच्या सह्यांचे निवेदन प्रसिद्धीसाठी देण्यात आले आहे.
सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या अंगावर हानिकारक रसायनमिश्रित शाई डोळ्याला इजा व्हावी, या हेतूने पिचकारीद्वारे टाकण्यात आली. त्यामुळे पाटील यांच्या डोळ्यास व शरीराच्या इतर भागास जखमा झाल्या. हा प्रकार पोलिसांसमक्ष झाला असे निवेदनात म्हटले आहे.
हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय वर्चस्वाला खीळ घालण्यासाठी, तालुक्यातील जातीय सलोखा नष्ट करण्यासाठी व राजकीय फायदा मिळविण्यासाठी हे कृत्य करण्यात आले आहे. हा कटकारस्थानाचा भाग आहे.
या भ्याड हल्ल्याच्या पाठीमागे विध्वंसक शक्ती आहे. राजकीय विरोधक आहेत, असा आमचा ठाम विश्वास आहे. पोलीस यंत्रणोकडून या प्रकरणाचा सखोल तपास होणार नाही. सूत्रधार पुढे येणार नाही.
यापुढेही असे अनर्थ होतील म्हणूनच प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत व्हावी. अन्यथा, काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. (वार्ताहर)