पोलिसांनी त्यांच्या वृत्तीत बदल करावा : उच्च न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 03:58 AM2018-02-28T03:58:53+5:302018-02-28T03:58:53+5:30
पोलिसांनी त्यांच्या वृत्तीत बदल करावा. त्यांनी लोकांशी चांगले वागावे. लोकांची सेवा करणे, हे त्यांचे कर्तव्य आहे, हे त्यांनी विसरू नये, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले.
मुंबई : पोलिसांनी त्यांच्या वृत्तीत बदल करावा. त्यांनी लोकांशी चांगले वागावे. लोकांची सेवा करणे, हे त्यांचे कर्तव्य आहे, हे त्यांनी विसरू नये, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले. नवी मुंबईचे बांधकाम व्यावसायिक सुनील लाहोरिया यांचा मुलगा संदीप लाहोरिया याचे काढलेले पोलीस संरक्षण परत देण्याचा आदेशही न्यायालयाने नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांना दिला.
कोणत्याही व्यक्तीची काहीही पार्श्वभूमी असली तरी त्याची बाजू ऐकून घेण्याचे कर्तव्य पोलिसांचे आहे. येथे लोकशाही आहे. हे मालदीव नाही, अशा शब्दांत न्या. भूषण गवई व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठाने नवी मुंबई आयुक्त हेमंत नागराळे यांना समज दिली.
गेल्या सुनावणीत न्यायालयाने नागराळे यांनी न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी चांगलीच खरडपट्टी काढली होती. संदीप लाहोरिया यांचे अचानक पोलीस संरक्षण काढल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने नागराळे यांना त्यांची बाजू ऐकण्याचे निर्देश दिले होते. मात्र नागराळे यांनी संदीप लाहोरिया यांचे म्हणणे न ऐकताच न्यायालयाच्या आदेशाबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य केले. नागराळे संदीप यांच्याशी अत्यंत उद्धटपणे वागल्याचा दावा संदीप यांचे वकील तन्वीर निझाम यांनी केला. नागराळे व संदीप यांच्यातील रेकॉर्डेड संवादही त्यांनी न्यायालयात सादर केला. त्यावर संतापत न्यायालयाने नागाराळे यांची पोलीस दलातील उर्वरित सेवा धोक्यात आणण्याचा संकेत देत न्यायालयाची माफी मागण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार, मंगळवारच्या सुनावणीत खुद्द हेमंत नागराळे न्यायालयात उपस्थित राहिले. त्यांनी न्यायालयाची माफी मागितली. मात्र, नागराळे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात काही त्रुटी असल्याने न्यायालयाने महाअधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांना समन्स बजावले. त्यावर कुंभकोणी यांनी एखाद्या पोलिसाने असे बोलणे योग्य नसल्याचे म्हटले. लाहोरिया यांनी केलेल्या याचिकेनुसार, जानेवारीमध्ये नागराळे यांनी संदीप लाहोरिया यांचे म्हणणे ऐकून न घेताच त्यांना नोटीस बजावून पोलीस संरक्षण काढून घेतले होते.
पोलीस संरक्षण परत देण्याचे निर्देश-
‘गुन्हेगारांशी बोलण्याची पोलिसांची एक पद्धत असते. त्यामुळे हळूहळू ये इतरांशीही तशाच भाषेत बोलतात,’ असे कुंभकोणी यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर ‘असे असेल तर त्यांनी (पोलिसांनी) त्यांची वृत्ती बदलावी. लोकांची सेवा करण्याचे पोलिसांचे कर्तव्य आहे. व्यक्तीची पार्श्वभूमी न पाहता त्याची बाजू ऐकणे, हे पोलिसांचे कर्तव्य आहे,’ असे म्हणत उच्च न्यायालयाने संदीप लाहोरिया यांना त्यांच्या वडिलांच्या मृत्यूचा खटला संपेपर्यंत पोलीस संरक्षण देण्याचे निर्देश हेमंत नागराळे यांना दिले.