अमरावती: आर्थिक परिस्थितीमुळे लग्नाचा प्रस्ताव फेटाळणाऱ्या तरुणाचं लग्नपोलिसांनी लावून दिल्याची घटना धारणीत घडली. यामुळे गावात आनंदाचं वातावरण आहे. गावातील एका तरुणानं आर्थिक कारणांमुळे तरुणीला लग्नाला नकार दिला होता. त्यामुळे दोन्ही कुटुंबात वितुष्ट निर्माण झालं. यानंतर प्रकरण पोलिसात पोहोचलं. रबांग पोलिसांनी तरुण, तरुणीसह त्यांच्या कुटुंबाची समजून काढली आणि पोलीस ठाण्यातच दोघांचं लग्न लावून दिलं. मेळघाटच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली. रबांग गावातील अशोक मोतीलाल कसदेकर (२२) व सरस्वती रामदास दहिकर (१९) या दोघांचे पाच महिन्यांपासून प्रेमंसंबंध होते. परंतु, आर्थिक परिस्थितीमुळे तरुणानं लग्नाची मागणी फेटाळली. त्यामुळे दोन्ही कुटुंबांत वाद निर्माण झाला आणि प्रकरण पोलिसांत पोहोचले. पोलिसांनी दोन्ही कुटुंबासह तरुण-तरुणीची समजूत काढली आणि लग्नासाठी रोख पाच हजार रुपये दिले. याशिवाय वर-वधूचे कपडे, दागिने, स्टील भांडी यांचा खर्चदेखील उचलला.
शनिवारी रबांग येथे आदिवासी रीतीरिवाजानुसार झालेल्या लग्नाला पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक प्रीती निचळे, पीएसआय रविकिरण खंडारे, पीएसआय चव्हाण, अनिल झारेकर, सचिन होले, नंदू पाटमासे, राजेश खाडेसह भाजप तालुकाध्यक्ष आप्पा पाटील, माजी आमदार पटल्या गुरुजी, जारेकर गुरुजी तसेच नातेवाईकांची उपस्थिती होती. मेळघाटाचे माजी आमदार पटल्या गुरुजी यांनी पोलिसांचे सहकार्याबद्दल आभार मानले.