वालचंदनगर : जवळपास २६ वर्षांनंतरदेखील वालचंदनगर पोलीस ठाण्याला त्यांच्या हक्काची इमारत मिळालेली नाही. आजही चौकी वालचंदनगरला व पोलीस ठाणे सात किलोमीटरवर जंक्शनला भाड्याच्या खोलीत कामकाज सुरू आहे. इमारत मोडकळीस आल्याने जीव मुठीत धरून कर्मचाऱ्यांना काम करण्याची वेळ आलेली आहे. वालचंदनगर पोलीस ठाण्याची स्थापना ५ आॅगस्ट १९९० मध्ये करण्यात आलेली आहे. त्या वेळी पोलीस अधीक्षक भगवंतराव मोरे होते. या भागातील खासदार म्हणून शंकरराव पाटील व आमदार गणपतराव पाटील यांच्या उपस्थितीत या ठाण्याचे उद्घाटन करण्यात आलेले होते. पोलीस ठाण्याला मोडकळीस आलेल्या भाड्याच्या धोकादायक खोलीत दिवस काढण्याची वेळ आली आहे. गेल्या २६ वर्षांपासून हे पोलीस ठाणे नवीन इमारतीच्या प्रतीक्षेत आहे. वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या नियोजित बांधकामासाठी हक्काची इमारत होण्यासाठी शेती महामंडळाच्या पाच एकरांच्या जमिनीसाठी ऐंशी लाखांचा करार होऊनही पोलीस ठाणे इमारतीपासून वंचितच आहे. येथील ५० कर्मचाऱ्यांना शासकीय सुविधा कधी मिळणार, या प्रतीक्षेत आहेत. पोलीस ठाणे जरी जंक्शनला असले तरी कर्मचारीवर्गाला कसलीही राहायला सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ३५ किलोमीटरवरील बारामती व इंदापूर शहरात राहण्याची वेळ कर्मचाऱ्यांवर आलेली आहे. (वार्ताहर)>पाच एकर जागा मंजूर : मोजणीअभावी क्षेत्राचा पत्ता नाहीया वालचंदनगर पोलीस ठाण्याचे नूतनीकरण व नवीन इमारत उभी राहण्यासाठी शेती महामंडळाच्या बारा एकर जमिनीचा पहिल्यांदा प्रस्ताव तयार करण्यात आलेला होता. २००२ मध्ये पुन्हा प्रस्ताव बदलून पाच एकर करण्यात आला. त्या पाच एकराला शेती महामंडळाने मंजुरी दिल्याने शासनाने शेती महामंडळाला ८० लाख रुपये दिले होते. मात्र आजही शेती महामंडळाकडून पोलीस ठाण्याला जमीन मोजून न दिल्याने नेमके पोलीस ठाणे कोठे उभारणार, याचा ताळमेळ लागला नाही. जमीन पोलीस ठाण्याला हस्तांतर करण्यात आलेली नाही. पोलीस ठाण्याची नेमकी जागा कुठे आहे, याची माहिती नाही. आज या वालचंदनगर कंपनीच्या भाड्याच्या खोलीत ३० रुपये प्रतिमहिना दिवस काढण्याची वेळ येथील पोलीस ठाण्यावर आलेली आहे. कर्मचाऱ्यांना हक्काची इमारत, सुविधा उपलब्ध नसल्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना बारामती व इंदापूर या तालुक्याच्या ठिकाणी राहायला जाण्याची वेळ येते.
भाडोत्री जागेतच पोलीस ठाणे
By admin | Published: June 29, 2016 1:20 AM