आसामची राजधानी गुवाहाटी हे सध्या महाराष्ट्राच्या सत्ताकारणाचे केंद्रबिंदू बनले आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार आसाममधील गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिकांनी नाराजी आणि संतापही व्यक्त केला आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती ढवळून निघत असतानाच शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी सेनाभवनाबाहेरही गर्दी करत शिवसेनेच्या आणि उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली होती. दरम्यान, आता मोठ्या प्रमाणात शिवसैनिक रस्त्यांवर उतरण्याची शक्यता व्यक्त करत महाराष्ट्रातीलपोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाण्यांना विशेषत: मुंबईतील पोलीस ठाण्यांना हाय अलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवसैनिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरू शकतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. शांतता कायम राहावी यासाठी पोलिसांना सतर्क राहण्यास सांगितलं असल्याची माहिती एएनआयनं महाराष्ट्र पोलिसांच्या हवाल्यानं दिली आहे.