उस्मानाबाद/नवी मुंबई : उस्मानाबादचे खासदार रवी गायकवाड यांना तिकीट नाकारल्याने त्यांचे समर्थक शनिवारी रात्री आंदोलनासाठी ‘मातोश्री’कडे निघाले होते. हे कळल्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री त्यांना तुळजापूर येथे रोखून परत पाठविले.रवी गायकवाड यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी शनिवारी उमरगा येथे मेळावा घेतला. त्यात ठरल्याप्रमाणे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी हे आपले राजीनामे देण्यासाठी व आंदोलनासाठी शनिवारी रात्री मुंबईकडे निघाले होते. दरम्यान, बसमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात येत होती. पोलिसांना ही माहिती कळताच त्यांनी तुळजापूर येथे पहाटे १ वाजण्याच्या सुमारास या समर्थकांच्या बसेस अडवून त्यांना रोखण्यात आले. यानंतर त्यांना नोटीस बजावून परत पाठविले. या नोटीसीत सकाळी ८ वाजेपुर्वी गाव सोडू नये, असेही निर्देशित केले होते. मात्र तरीही रातोरात इतर वाहनांची सोय करून अनेकजण मुंबईच्या दिशेने रवाना झाले. दरम्यान, समर्थकांच्या काही बसेस मुंबई जवळील वाशी टोलनाक्यानजिकही अडविण्यात आल्या होत्या़ तेथूनही निसटलेल्या समर्थकांना दादर पोलिसांनी ‘मातोश्री’कडे जाण्यापासून रोखले असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले़
‘मातोश्री’कडे निघालेल्या शिवसैनिकांना पोलिसांनी रोखले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 12:59 AM