पुणे : लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर पोलीस उपनिरीक्षकाने बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संतोष केशव सोनावणे (वय ३०, रा. हडपसर) या पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली आहे.हडपसर येथील पीडित वीस वर्षीय तरुणीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हा गुन्हा मुंब्रा पोलिसांनी वानवडी पोलिसांकडे वर्ग केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष सोनावणे हा ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. त्याचे सासर पुण्याचे आहे. पीडित मुलीचे वडील व सोनावणेचे सासरे हे एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे सोनावणे याला राहण्यासाठी पीडित मुलीच्या सोसायटीत भाड्याने सदनिका घेऊन दिली होती. सोनावणे हा ठाणे येथे कार्यरत असल्याने तो अधूनमधून पुण्यात यायचा. या काळात त्याचे पीडित तरुणीशी ओळख झाल्यानंतर त्यांचे बोलणे व्हायचे. या काळात त्याने तरुणीला बीएस्सी पुढील शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देतो म्हणत तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर दिनांक १३ व १७ एप्रिल रोजी त्याने तिच्यावर पुण्यात लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर विष पिऊन आत्महत्या करीन, अशी धमकी देत तिला २३ एप्रिल रोजी मुंबईत येण्यास भाग पाडले. त्यासाठी तरुणीला स्टेशनपर्यंत मित्राची रिक्षा पाठवून तिला स्टेशनला सोडले. त्यानंतर पीडित तरुणी रेल्वेने ठाण्यात गेली. ठाण्यातील एक लॉजावर तिच्यावर अत्याचार केले. कळवा येथील भाड्याने घेतलेल्या सदनिकेत दि. २३ ते २६ एप्रिल या कालावधीत तिला बंद करुन ठेवले. पत्नी असल्याचे भासविण्यासाठी तिला मंगळसूत्र घालण्यास भाग पाडले. तसेच तिच्यावर याठिकाणी जबरदस्तीने अत्याचार केला, असे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. तरुणीच्या पालकांनी वानवडी पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली होती. >वानवडी पोलिसांना पीडित तरुणी कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तरुणीचे पालक व पोलीस हवालदार गजरमल यांना तिथे पाठवले. त्यांचा शोध घेऊन पीडित मुलगी मिळाल्यानंतर कळवा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तो वानवडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. वानवडी पोलिसांनी सोनवणे याला अटक केली आहे.
बलात्कारप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाला अटक
By admin | Published: April 29, 2016 1:00 AM