ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 8 - शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर लग्नाला नकार देणाऱ्या एका पोलीस उपनिरीक्षकाविरुद्ध एका तरुणीने बलात्काराचा आरोप लावला. सचिन वामन मत्ते (वय ३०) असे आरोपी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून तो अंबाझरीतील रविनगर शासकीय वसाहतीत राहतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिट्टीखदान ठाण्यात कार्यरत असलेला उपनिरीक्षक सचिन आणि तक्रारकर्ती तरुणी (वय २३) एकाच जिल्ह्यातील रहिवासी आहे. ही तरुणी आणि सचिनच्या मामेबहिणीची ओळख आहे. तरुणी पोलीस भरतीची तयारी करीत असल्यामुळे तिने सचिनकडून मार्गदर्शन घेणे सुरू केले. डिसेंबर २०१५ मध्ये मामेबहिणीकडून मोबाईलनंबर घेतल्यानंतर त्यांच्यात नियमित बातचित होऊ लागली. तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, जून ते आॅगस्ट २०१६ या तीन महिन्यात या दोघांनी अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले.तरुणीच्या तक्रारीनुसार, प्रत्येकवेळी सचिनने तिला लग्नाचे आमिष दाखवले होते. आता मात्र तो लग्नाला नकार देत होता. या कारणावरून ६ सप्टेंबरला त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. सचिनने यावेळी तिला मारहाण केली. अश्लील शिवीगाळही केली. त्यामुळे तरुणीने अंबाझरी ठाण्यात धाव घेतली. ती बलात्काराची तक्रार देणार असल्याचे लक्षात आल्याने तिचे मन वळविण्याचे बरेच प्रयत्न झाले. बुधवारी या दोघांनाही एकत्र बसवून त्यांचे मन वळविण्याचे आणि समेट घडवून आणण्याचे पोलिसांनी दिवसभर प्रयत्न केले. मात्र, लग्न केले तरच आपण तक्रार करणार नाही, अशी भूमिका तरुणीने घेतली. तर, सचिनने लग्नाला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे तरुणीने अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपी सचिन मत्ते विरुद्ध बलात्कार तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. वृत्त लिहिस्तोवर आरोपीला अटक झालेली नव्हती.