लक्ष्मण मोरे, पुणेअनेक मुलींना गंडा घालत त्यांची फसवणूक करणारा सहाय्यक पोलीस निरीक्षकच लखोबा लोखंडे निघाला असून, त्याने तीन महिलांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारल्याची माहिती ‘लोकमत’ च्या हाती आली आहे. फरासखाना पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम केलेल्या आणि अंगावरील गणवेशाच्या ‘ताकदी’ची जाणिव झालेल्या या बहाद्दराने तीन तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्या कुटुंबियांकडून त्याने लाखो रुपये, सोने नाणे आणि वाहने खरेदी करुन घेतल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. महिलांनी समोर येऊन तक्रार देऊनही अद्याप या उपनिरीक्षकाला पोलिसांनी अटक केलेली नाही. गजानन आनंद गिरी (मूळ रा. सावरखेडा, जि. हिंगोली) असे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. गिरी हा २०११-१२ मध्ये पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून भरती झाला होता. २०१३ मध्ये फरासखाना पोलीस ठाण्यामध्ये नेमणुकीस असताना त्याचे काजल कैलास गिरी या तरुणीशी लग्न ठरले होते. आपण स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करीत असल्याचे कारण देत त्याने लग्न साधेपणाने करण्याची अट घातली होती. त्यानुसार काजलच्या कुटुंबियांनी आळंदी येथे २२ जानेवारी २०१४ रोजी त्यांचे लग्न लावून दिले. त्यावेळी त्याने साडेपाच लाख रुपये हुंडा, ८ तोळ्याचे सोन्याचे दागिने घेतले. त्यानंतर अवघ्या दहा दिवसांनंतरच त्याने काजलला मारहाण सुरु केली. आळंदीमध्ये लग्न लावून दिल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत त्याने पुन्हा दुसऱ्यांदा थाटामाटात लग्न लावून देण्याचा आग्रह धरला. याला पत्नीने विरोध केल्यावर त्याने पुन्हा मारहाण सुरु केली. काजलने ही बाब माहेरच्यांना सांगितल्यानंतर त्यांनीही गिरी याला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने आग्रह सोडला नाही. अखेर २२ फेब्रुवारी रोजी दुसऱ्यांदा थाटामाटात लग्न लावून दिले. त्यावेळी गिरी याने हुंड्यामध्ये बुलेट घेतली. लग्नानंतर हिंगोलीला मूळ गावी गेल्यावर आठवडाभरातच त्याने आणि त्याच्या कुटुंबियांनी काजलला मारहाण सुरु केली. या त्रासामुळे काजल आजारी पडली. तिला पुन्हा पुण्यात आणून रुग्णालयात दाखल करुन माहेरी सोडण्यात आले. त्यावेळी काजलच्या आईवडीलांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने सासऱ्यांनाच धमकी देत नांदवणार नसल्याचे सांगितले.
पोलीस उपनिरीक्षकाची भामटे‘गिरी’
By admin | Published: September 13, 2014 2:37 AM