वडनेरची घटना : सेवाग्राम रुग्णालयात उपचारहिंगणघाट(जि.वर्धा) : तालुक्यातील वडनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सारंग चव्हाण यांनी बुधवारी पोलीस ठाण्याच्या परिसरात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने वेळीच उपचार मिळाल्याने ते यातून बचावले. सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. विषारी द्रव्य प्राशन करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी हस्तगत केली आहे. त्यात दोन पोलिसांची नावे असून त्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करीत आहे, असे नमूद असल्याचेही पोलीस सूत्राने सांगितले. रात्रीला चव्हाण व काही पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. या वादातूनच चव्हाण यांनी हे पाऊल उचलले असावे, असा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे. तपासाची सूत्रे वर्धेचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. अपर पोलीस अधीक्षक स्मीता पाटील व तपास अधिकारी वानखेडे यांनी दुपारी घटनास्थळाचा भेट दिली.पोलीस सूत्रानुसार, पोलीस उपनिरीक्षक सारंग चव्हाण हे मूळचे नाशिक येथील आहे. ते हिंगणघाट तालुक्यातील वडनेर पोलीस ठाण्यात परिविक्षाधिन अधिकारी म्हणून कार्यरत आहे. मागील वर्षी त्यांचे लग्न झाले. आज सकाळी अचानक त्यांनी हार्पिक नामक विषारी द्रव्य प्राशन केले. याची माहिती होताच स्थानिक पोलिसांनी लगेच वडनेर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.प्राथमिक उपचारानंतर त्वरित सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असून बेशुद्धावस्थेत असल्यामुळे त्यांचे बयाण नोंदविता आले नसल्याचे सांगण्यात आले.(तालुका प्रतिनिधी)