लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मॉडेल कृतिका चौधरी हत्येचे गूढ कायम असून आता तिला ड्रग्जचे व्यसन होते, त्यामुळे तिची अमली पदार्थाची विक्री करणाऱ्याकडून हत्या करण्यात आली का, या दृष्टीने पोलीस तपास करीत करीत आहेत. कृतिकाच्या फ्लॅटमधून दागिने व पैसे लंपास झाल्याने चोरीसाठी कृतिकाला मारण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सोमवारी राहत्या घरी कृतिका मृतावस्थेत आढळून आली. प्रकरणाचा तपास अंबोली पोलिसांसह क्राइम ब्रांचचे युनिट-९ कडून करण्यात येत आहे. कृतिकाला नशा करण्याचे व्यसन जडले होते. ती काही ठरावीक पेडलर्सकडून अमली पदार्थ विकत घ्यायची, अशी माहितीदेखील पोलिसांना मिळाली आहे. त्यानुसार याप्रकरणी काही ड्रग पेडलर्सची पोलीस कसून चौकशी करत आहेत. कृतिकाच्या हत्येनंतर घरातील दागिने आणि पैसे गायब असल्याचा दावा कृतिकाचा भाऊ विशाल तसेच घरच्यांनी केला आहे. त्यामुळे चोरी करण्यासाठी एखाद्या ड्रग पेडलरने हे सर्व केले असेल, असा संशय पोलिसांना आहे. याबाबत गुरुवारी अभिलेखावरील अमली पदार्थ विक्रेत्याकडे पोलिसांनी चौकशी केली. कृतिका राहत असलेल्या इमारतीच्या सुरक्षारक्षकाला तसेच तिच्या एका मित्राला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र अद्याप त्याच्या तपासात काही निष्पन्न झाले नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. त्यामुळे प्रकरणाचा गुंता वाढत चालला आहे. ६ जूनला तिने घरच्यांशी अखेरचा संवाद साधला होता. त्यानंतर ती कोणाच्याही संपर्कात नव्हती.
ड्रग्सच्या व्यसनातून मॉडेल कृतिका चौधरीची हत्या झाल्याचा पोलिसांना संशय
By admin | Published: June 16, 2017 1:09 AM