जमीर काझी,मुंबई- पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार व गैरव्यवहाराविरुद्ध आवाज उठविणाऱ्या पोलीस हवालदार सुनील टोके यांना एका पोलिसाकडून ठार मारण्याच्या धमकी प्रकरणाचा तपास गुन्हा अन्वेषण शाखेकडे देण्यात आला आहे. हवालदार टोके यांचा सोमवारी सविस्तर जबाब नोंदवून घेण्यात आला असून त्यांना धमकाविणारा हवालदार भरत आगवणे याच्याकडे उद्या चौकशी करण्यात येणार आहे. अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या पोलिसाला सहकाऱ्याकडून धमकाविण्याची ही मुंबई पोलीस दलातील पहिलीच घटना आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या उन्हाळी अधिवेशनात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता असल्याने पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण शाखेकडे दिला. त्यानुसार साहाय्यक आयुक्त रमेश गावित यांनी याबाबत सोमवारी टोके यांचा सविस्तर जबाब नोंदविला. त्यात आगवणे याने ‘नोकरी गेल्यानंतर वरिष्ठ अधिकारी तुझा पानसरे, दाभोलकर करणार आहेत’, असे धमकावल्याचे नमूद केले आहे. टोके यांनी वाहतूक शाखेतील भ्रष्टाचाराविरुद्ध उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. त्याचप्रमाणे कॉन्स्टेबल तुषार तिऊरवडे व संतोष कदम यांच्याकडून शोषण झालेल्या पीडित तरुणीला न्याय मिळण्यासाठी मार्गदर्शन करीत आहेत. तरुणीवरील अत्याचार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर ते वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झले. त्या रागाने कदम याचा मित्र हवालदार आगवणे याने बुधवारी टोके यांच्या घरी जाऊन दमदाटी केली. ‘तुला पोलीस खात्यात नोकरी करायची नाही का, भ्रष्टाचार, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात का भांडत आहेस? पीडित तरुणीला मदत करू नकोस, अन्यथा तुला बघून घेऊ’ असे धमकावल्याची तक्रार आहे.>आयुक्तांकडून दखलटोके यांनी तातडीने वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी गेले होते. मात्र त्यांचे रीडर निरीक्षक अनावकर यांनी तुम्ही रीतसर अर्ज द्या, असे सांगून परत पाठविले होते. त्यामुळे हवालदार टोके यांनी यासंबंधीचा अर्ज व्हॉट्सअॅपवरून आयुक्तांना पाठविला होता.
पोलिसाला धमकी प्रकरण क्राइम ब्रँचकडे
By admin | Published: March 07, 2017 5:00 AM