मुंबई: गृह मंत्रालयातील बदल्यांचा घोटाळा बाहेर काढल्यानं मुंबई पोलिसांनी नोटीस बजावल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दुपारी पत्रकार परिषद घेत सांगितलं. पोलिसांच्या सायबर सेलनं उद्या चौकशीसाठी बोलावलं असून मी त्यासाठी जाणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. मात्र त्यानंतर अवघ्या काही तासांत महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. फडणवीसांना बीकेसी पोलीस ठाण्यात बोलावलं जाणार नाही. त्याऐवजी पोलीस अधिकारीच त्यांच्या शासकीय निवासस्थानी जातील, अशी माहिती समोर आली आहे.
फडणवीस यांचा जबाब नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांनी त्यांना बीकेसीतील पोलीस ठाण्यात बोलावलं होतं. त्यासाठी आपण उद्या पोलीस ठाण्यात जबाब नोंदवू अशी माहिती फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. मात्र आता पोलीस अधिकारीच फडणवीस यांच्या सागर या शासकीय निवासस्थानी जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. फडणवीस बीकेसी पोलीस ठाण्यात जाणार नाहीत. त्याऐवजी पोलीस अधिकारीच फडणवीसांच्या घरी जाऊन जबाब घेणार आहेत.
फडणवीसांना पोलीस ठाण्यात बोलावून जबाब नोंदवण्यासंदर्भात गृहखात्यात बरीच चर्चा झाली. फडणवीस पोलीस ठाण्यात आल्यास भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरू शकतात. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच फडणवीसांना पोलीस ठाण्यात न बोलावण्याचा निर्णय झाल्याचं समजतं.
फडणवीस यांना पोलीस ठाण्यात न बोलावण्यामागे काही राजकीय कारणंदेखील आहेत. फडणवीस पोलीस ठाण्यात गेल्यास तिथे भाजप कार्यकर्ते जमतील. त्यामुळे भाजपला शक्तिप्रदर्शन करण्याची संधी मिळेल. याआधी भाजप नेते जेव्हा जेव्हा पोलीस ठाण्यात गेले, तेव्हा तेव्हा पोलीस स्थानकाबाहेर भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळेच पोलीस अधिकाऱ्यांना फडणवीसांच्या निवासस्थानी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.