नागपूर : राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी काढलेल्या युवा संघर्ष यात्रेचा आज राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर येथे समारोप झाला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी समारोपावेळी भाषण करत विविध मुद्द्यांवरून सरकारवर टीकेची झोड उठवली. तसंच शेतकरी आणि युवांच्या प्रश्नांबाबत आमच्या काही मागण्या आहेत. त्यामुळे या मागण्यांचं निवेदन स्वीकारण्यासाठी सरकारने आपला एक प्रतिनिधी इथं पाठवावा, अशी मागणी रोहित पवार यांच्याकडून आपल्या भाषणात वारंवार केली जात होती. मात्र युवा संघर्ष यात्रेची समारोप सभा पार पडल्यानंतरही कोणताही सरकारी प्रतिनिधी निवेदन स्वीकारण्यासाठी न आल्याने रोहित पवार हे आपल्या कार्यकर्त्यांसह विधिमंडळाकडे निघाले होते. मात्र विधिमंडळाकडे जात असतानाच पोलिसांनी रोहित पवार यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आल्याने परिसरात प्रचंड तणाव आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे. ताब्यात घेण्यात आल्यानंतर रोहित पवार आणि इतर कार्यकर्त्यांना डिटेन्शन सेंटरमध्ये नेण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
पोलीस काय म्हणाले?
"तुम्ही शांततापूर्वक येथून परत जा, असं आम्ही आमदार रोहित पवार यांना सांगितलं होतं. मात्र परवानगी नसतानाही ते विधिमंडळाकडे निघाले होते. त्यामुळे आम्हाला त्यांना ताब्यात घ्यावं लागलं," असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, "राज्यभरातील युवांनी काढलेल्या युवा संघर्ष यात्रेची धास्ती घेऊन पळ काढणाऱ्या आणि पोलिसांना पुढं करुन बळाचा वापर करणाऱ्या या गोंधळलेल्या, निकामी आणि पळकुट्या सरकारचा तीव्र धिक्कार आणि निषेध," अशी पोस्ट नागपुरातील राड्यानंतर रोहित पवार यांच्या 'एक्स 'अकाऊंटवर लिहिण्यात आली आहे.